You are currently viewing महाराष्ट्र शासनाकडून रेडी यशवंतगड किल्ल्यासाठी ९.१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर…

महाराष्ट्र शासनाकडून रेडी यशवंतगड किल्ल्यासाठी ९.१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर…

वेंगुर्ला :

 

महाराष्ट्र शासनाच्या सन २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात मान. वित्तमंत्र्यांनी शिवकालीन किल्ल्यांच्या जतन संवर्धनासाठी ३०० कोटी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याबाबतच्या १०३ कोटीच्या पुरवणी मागणीस मान्यता देण्यात आली. या अनुषंगाने शिवकालीन किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन यशवंतगड किल्ला, सुकळभाट – रेडी, ता.वेंगुर्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याची विनंती संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालनालय यांनी मागणी केली असता सदर प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे.

सदर कामास ९,१६,३१,३४९ रु. चा निधी मंजूर झाला आहे. यशवंतगड किल्ल्यास निधी मंजूर व्हावा म्हणून शिवप्रेमी तसेच भाजपा ता.उपाध्यक्ष व माजी सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी सातत्याने भाजपाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे पाठपुरावा केला. त्यांच्याच शिफारशीनुसार सदर काम मंजूर झाले असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता आणि लोकाभिमुख राज्यकारभाराचा जागतिक आदर्श ठरलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांचे गड किल्ले पुनर्जीवित करण्याचा महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनीही शासनाचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा