*शांत संयमी दीपक केसरकर यांनी केले फलकाचे अनावरण*
*भाजपा,शिवसेना (शिंदे गट, राष्ट्रवादी महायुती सरकार मधील मतभेद चव्हाट्यावर*
सावंतवाडी:
राजकारणातील मैत्री, युती ही केवळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच स्वस्वार्थ जपून केलेली असते हे माजगाव येथील विकासकामांच्या भूमी पूजन सोहळ्याच्या निमित्ताने सिद्ध झाले. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री नाम.दीपक केसरकर यांच्या हस्ते आज सावंतवाडी जवळील माजगाव येथे माजगाव लघु पाटबंधारे विभाग मार्फत धरण बांधण्याच्या कामाचे भूमीपूजन होणार आहे. परंतु सत्तेतील वाटेकरी असलेल्या दोन्ही पक्षांच्या श्रेयवादातून माजगाव येथील लघु पाटबंधारे विभागाच्या धरणाच्या कामाचे भूमीपूजन नाम.दीपक केसरकर यांनी नियोजित वेळी करण्यापूर्वीच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विधानपरिषदेचे माजी आमदार राजन तेली यांनी सकाळीच सरपंच माजगाव व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरचे भूमी पूजन करून मोकळे झाले. त्यामुळे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र असले तरी सारेकाही आलबेल नसून दोन्ही पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले.
मागील विधानसभा निवडणुकीच्या दोन टर्ममध्ये सावंतवाडीचे नाम.दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवताना प्रतिस्पर्धी असलेल्या माजी आमदार राजन तेली यांचा दोन वेळा निवडणुकीत पराभव केला होता. त्यामुळे ना. दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली हे जरी एकत्र सत्तेत असले तरी दोघांमध्ये विळ्या भोपळ्याचे नाते असल्याचे मतदारसंघातील जनतेला आणि अवघ्या महाराष्ट्राला वारंवार दिसून येत आहे. आज माजगाव येथील विकास कामांचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने घडलेला प्रकार पाहिला असता शिवसेना आणि भाजपमध्ये जरी राज्यपातळीवर सत्तेची फळे एकत्र चाखत असले तरी गावागावात आपापल्या मतदारसंघात भाजप शिवसेना एकमेकांच्या विरोधातच उभी असलेली दिसून येते. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढतील की एकमेकांच्या उरावर बसतील हे पाहणे कौस्तुक्याचे ठरेल.