*कुणकेरी नं.१ (सावंतवाडी), आचरे नं.१ (मालवण), कलमठ गावडेवाडी (कणकवली) आदी शाळेचा समावेश*
मालवण :
चालू वर्ष आहे पूज्य साने गुरुजींचे शतकोत्तरी जन्मवर्ष असून यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्शवत काम करणाऱ्या 11 शालेय कथामालांचा विशेष गौरव करण्याचे मालवण साने गुरुजी कथामालेने ठरविले आहे.
यात शाळेच्या मुख्याध्यापकांसोबतच सर्व सहकारी शिक्षक वर्ग, आदर्श कथानिवेदन करणारी मुले, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक यांचाही गौरव करण्यात येणार आहे. सदर गौरव सोहळा रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी संध्याकाळी ठीक 3 वाजता निलेश सरजोशी यांचे मांगल्य मंगल कार्यालय आचरे – वरची येथे होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी मंदार श्रीकांत सांबारी, (अध्यक्ष वैभवशाली पतसंस्था आचरे) हे असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामचंद्र विष्णू आंगणे (स्वीय सहायक शालेय शिक्षण मंत्री), उज्वला धानजी (बँक ऑफ महाराष्ट्र कणकवली), भरत गावडे (कथामाला सदस्य), निलेश सरजोशी (कथामाला प्रेमी) हे असणार आहेत. यावेळी निवड झालेल्या कथामाला शाळांच्या वतीने विठ्ठल कदम, मुख्याध्यापक कुणकेरी नं.१ व प्रशांत पारकर, मुख्याध्यापक मसुरे देऊळवाडा हे आपल्या कथामालांविषयी माहिती देतील. निवड झालेल्या अकरा कथामाला पुढील प्रमाणे –
१) कथामाला जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, कुणकेरी नं.१
२) कथामाला जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, मसुरे देऊळवाडा
३) कथामाला जि.प. प्राथमिक शाळा, मसुरे भोगलेवाडी
४) कथामाला जि.प. प्राथमिक शाळा, चिंदर पडेकाप
५) कथामाला जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, आचरे नं.१
६) कथामाला जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, ओवळीये नं.१
७) कथामाला जीवन शिक्षण विद्यामंदिर आचरे – पारवाडी
८) कथामाला जि.प. प्राथमिक शाळा, कलमठ गावडेवाडी
९) कथामाला जि.प.शाळा, आचरे बागजामुडूल
१०) कथामाला जि.प. प्राथमिक शाळा, आचरे डोंगरेवाडी
११) कथामाला जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, पळसंब नं.१
याविषयी बोलताना सुरेश ठाकूर, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला शाखा मालवण म्हणाले, “चाळीस वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कथामालेचे काम शाळाशाळांत सुरू होते. अलीकडे तो प्रवाह जरी मंदावला असला तरीही, काही शाळा, काही शिक्षक आणि काही कार्यकर्ते हे कार्य सेवाभावी वृत्तीने करीत आहेत. त्यांच्या गौरवाने कथामाला कार्याला अधिक चालना मिळेल, असा मला विश्वास आहे.”
निवड झालेल्या सर्व कथामाला शाखांचे अखिल भारतीय साने गुरुजी कथामालाचे अध्यक्ष शामराव कराळे यांनी अभिनंदन केले आहे.