You are currently viewing तुझ्या पाऊलांनी..

तुझ्या पाऊलांनी..

*लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासिका लेखिका कवयित्री सौ.भारती भाईक लिखित अप्रतिम ललित लेख*

 

*तुझ्या पाऊलांनी…*

 

माझ्या लतापुष्पवेलींनी सुशोभित झालेल्या अंगणात, हुळहुळत्या गारव्यात गुलाबी हवेसवे कुजबूज करीत मृदुल करांनी जेव्हा संमार्जन घालते ना…तेव्हा जो मोद अंतरी होतो, त्या मोदलक्ष्मीस पाहतांना अंतरी सुखावते मी.🌸

 

रेशमी काळोखात जरा कलता होणारा तो अनुपम चंद्र , त्या मनोहारी सौंदर्यास पाहता, सुखावते अंतरी. झुळझुळणारी हवा बट कुरळी गालावर स्पर्शते नि सखयाची प्रीती गालावर रेंगाळत असता उमटणा-या खळीत सुस्मितात हरवते नि पापणकडा स्मृतिगंधात सलज्ज झुकतात …त्या प्रीत लक्ष्मीस समीप पाहता, सुखावते अंतरी.🌸

 

त्या अर्धोन्मिलित फुलाफुलांवर 🌸ओसांडलेलं दवबिंदूंचं असणं म्हणजे जणू निसर्ग देवतेने नुकतंच त्यांचं अवघ्राण केलेलं वाटतं. मोहक वातावरणात, टपटप पडणारा प्राजक्त ओंजळीत घेता, त्या स्वर्गिय गंधात न्हाऊन जाते मी. 💮🌼🌸

 

क्षितिजावर उगवत्या केशर लालीने माखलेली, पैंजणांच्या रुणझुणत्या नादात,सुरेख नाजुक करकमले, जेव्हा कुंकवाने शृंगारीत होऊन हळदीच्या नक्षीवर रेंगाळत ,माझ्या प्राजक्ती अंगणातील सुबक रांगोळीवर येऊन थबकतात ना..तेव्हा हे सौभाग्य लक्ष्मी, मी अंतरातून सुखावते. हवंहवंसं वाटतं तुझं येणं.🌹

 

नुकतीच सुस्नात झालेली, ओलेत्या कुरळकुंतलांना जरा बंधमुक्त करताच सुवर्ण किरणांत उमटलेले ते जलतुषाराचे स्वर्णिम आभा ल्यायिलेले लावण्य…हे सौंदर्य लक्ष्मी… सुखावते अंतरातून. 🌷

 

तुळशी वृंदावनातील, माझ्या सौष्ठव लाभलेल्या, डवरलेल्या तुळशीजवळ, रेखिलेल्या रांगोळीत रंग भरते नि लावलेल्या द्विपाच्या ज्योतीसवे नृत्य करणारी सुगंधित वलये मन मोहून जातात.तेव्हा ती मोहमयी लक्ष्मीस पाहता, सुखावते मी अंतरी.🌳🌹

 

*नभांगणात उमटलेली सोनकळी किरणे चहूदिशांनी विखुरताच जे चैतन्य बहरतं ना…त्या चैतन्य लक्ष्मीस पाहता सुखावते अंतरी*.🌻🌷

 

*जे जे सुंदर… तेथे लक्ष्मी..!!*

*तेव्हा जे जे सुंदर गवसतं मजला .. ते ते लक्ष्मी रुप मानते मी..नि तुझ्या पाऊलांनी सौभाग्य चालत येतं माझ्या संसारी.हे सुख अंतरातलं अक्षयी असू देत.*🌹🌸🌷

 

🌹सौ. भारती भाईक🌹

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा