You are currently viewing कलाक्षेत्र

कलाक्षेत्र

*लेखिका, पत्रकार मेघा कुलकर्णी (मेघनुश्री) लिखित अप्रतिम लेख*

 

*कलाक्षेत्र*

 

रंगशाळा, रंगभूमी, चित्रपट या सगळ्यांची माता म्हणजे कलेचे क्षेत्र. कलेत विविधता आहे पण त्याचबरोबर तेच वैविध्य कलाकारांतही आहे. संपूर्ण जीवनाचे योगदान देणारे महान कलाकार या क्षेत्राने दिले आहेत. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागांतही मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. लोककलांमधून सामाजिक संदेश जनतेला मिळायचे. मिळेल तशी साधनसामग्री एकवटत कला सादर केली जायची. आज या चलतचित्रसृष्टीलाही शतकोत्तराची परंपरा लाभली आहे. इतर अनेक क्षेत्रांत काम करणारी मंडळी कलासक्त भक्तीने या क्षेत्राकडे ओढली जातात आणि कलाकार असामान्य होतो.

कोल्हापूर या शहरावर सर्वच कलाकारांचे मनापासून प्रेम, कधी कामाची इथूनच झालेली सुरवात किंवा मिळालेली संधी पुढे जाऊनही त्यांच्यासाठी अविस्मरणीय असते. महाविद्यालयातील कलाविभाग निवडताना एकच विचार विद्यार्थ्यांपेक्षा इतरांच्या मनांत येत असतो, “इकडे जाऊन यांत काय करणार?” पण प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीवर विश्वास ठेवून कार्यरत राहिले की बरेच काही करता येते आजच्या घडीला. पूर्वी या क्षेत्रांत काम करणे फारसे मान्य नसायचे. पण आज परिस्थिती इतकी बदलली आहे की जसे इतरत्र लोक दैनंदिन भोजन व्यवस्थे सहित कामावर जातात तसेच कलाकार कामाच्या वेगवेगळ्या वेळां सांभाळत असतात, धावपळ करत असतात, कोणत्याही वयांत अशावेळी कलेवरचे प्रेम श्रेष्ठ ठरते.

खरं तर ही वाटचाल सोपी नाही. यशाची पायरी चढताना अपयशाचा कालावधी विसरून पुढे जाता आले पाहिजे. प्रसिद्धीच्या झोताचा मुकुट सांभाळताना पाय सदोदित जमिनीवर रहातील याची काळजी घेणे भाग आहे. हितचिंतक, हितशत्रू कोण हे वेळेत उमगणे, ओळखणे नितांत गरजेचे आहे. आपल्या अभिनयाच्या ताकदीवर गर्दीचा दर्दी प्रेक्षकवर्ग निर्माण करणे हे कौशल्य आहे. सततचे दौरे करताना मनोरंजनासाठी आसुसलेल्या प्रेक्षकांसमोर हसतमुखाने वावरत असतात हे कलेचे शिलेदार. अचानक कलाक्षेत्रांतील, समूहांतील व्यक्तिमत्व जेव्हां काळाच्या पडद्याआड जातो तेव्हां “शो मस्ट गो ऑन” हे म्हणत रंगमंचावर कला सादर केली जाते, पण दुसरी बाजू पहाता हे त्या सर्व कलाकारांसाठी प्रचंड अवघड असते. परंतु प्रेक्षकवर्गाला नाराज न करता काम करत राहणे हे ध्येय त्यांनी उराशी बाळगलेले असते.

चंदेरी दुनियेत प्रवेश करताना त्या व्यक्तीलाही जाणवते अपरंपार कष्टाशिवाय पर्याय नाही. इतर क्षेत्रासारखे या कलाक्षेत्रात मराठी पाऊल पुढेच पडते आहे यांत शंका नाही. अनेक वर्षे कार्य करत मिळवलेले नांव टिकवून ठेवायची धडपड कलाकाराला करावीच लागते. कारण त्याचे आयुष्य पूर्णपणे समाजाचे झालेले असते. त्याच्या जीवनांतील छोटयाशा बदलाची हवा क्षणांत कर्णोपकर्णी होते. रसिकमनांवर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवणे, अनंत प्रलोभनांना टाळून वैचारिक क्षमतेने त्याच्यावर मात करणे अशा वेगवेगळ्या कसरती आयुष्यभर कराव्या लागतात. सौंदर्य आणि सादरीकरण सोबत वैविध्य, नाविन्य जपणारं कलाक्षेत्र म्हणूनच महान आहे. साहित्य, संस्कृती आणि भाषा यांच्याशी अत्यंत निगडीत असलेले हे क्षेत्र. स्पर्धेपेक्षा वलयाला महत्व, स्थैर्यातील अस्थिरता आणि तरीही जे काम, भूमिका समोर येते ते मनापासून करणारी ही कलाकार मंडळी यांबद्दल एक आदराचे स्थान असते. सन्मान, पुरस्कार स्वीकारताना संपूर्ण सभागृह त्यांच्या कर्तुत्वाला वंदन करण्यासाठी उभे रहाते, सहकारी कलाकारांचे डोळे आनंदाश्रू ने भरतात तेव्हां साकारलेल्या सर्व भूमिका क्षणांत डोळ्यांसमोरून तरळत असाव्यात असे जाणवते.

सुखदु:खाच्या कोणत्याही क्षणी मनोरंजनाचे अनेक पैलू सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हसू फुलवतात. जीवनभराच्या योगदानाचे आणि यशाचे श्रेयही प्रेक्षकवर्गाला [मायबाप रसिकाला] दिले जाते. दृश्यस्वरूपांत झळाळणारे, चमकणारे तेजोवलय त्याच्यामागे किती ठाम निर्धार असतो, याची जाणीव असायला हवी. कलाक्षेत्राची महती शब्दांत बांधणे अशक्यच, तरीही एक कोल्हापूरकर म्हणून भावनेचा ओलावा आणि मनांतील सुगंधाची उधळण प्रवाही करण्याचा हा प्रयत्न.

 

मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]

भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२

प्रतिक्रिया व्यक्त करा