You are currently viewing माझा गाव : माझी संस्कृती..

माझा गाव : माझी संस्कृती..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझा गाव : माझी संस्कृती..*

 

मंडळी..

.नमस्कार …

 

आज कालची बदललेली शहरे, खेडी सारे पहात असतांना

तुम्हालाही तुमचे लहानपण आठवत असेलंच! हो, स्वातंत्र्य

आले, सुधारणा येऊ घातल्या होत्या पण आपण अजून त्याच

त्या रूढी परंपरांमध्ये गुरफटून पडलो होतो, हे ही खरेच आहे

नाही का? रूढी परंपरा म्हटल्या बरोबर मी एकदम भूतकाळात

गेले बघा. तुम्ही ही नक्कीच भूतकाळात डोकावून पहात असणारंच! नक्कीच! आज मी तुम्हाला लहानपणच्या अगदी

बारीकसारीक गोष्टींची व अनुभवातून आपण काय काय शिकतो याची आठवण करून देणार आहे.

 

खरे पाहिले तर, नीट डोळसपणे हं, आपल्या परंपरा रिवाज

खूप चांगले होते.अगदी साध्या साध्या गोष्टीतून माणूसपण,

त्याची जपणूक, संस्कारांची पेरणी ह्या गोष्टींची रूजवण मोठ्यांच्या वर्तनातून आपोआप होत असे. त्या साठी वेगळ्या

खास प्रयत्नांची गरजच लोकांना वाटत नव्हती इतका एकोपा

समाजात होता.त्याची अगदी साधी साधी उदाहरणे मी तुम्हाला

देणार आहे.माझ्या वडिलांचे गावाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष होते हे वेळोवेळी मी तुम्हाला सांगितले आहेच.आपल्या

कडे बाराही महिने कुठले न कुठले सणवार चालूच असतात.

आता त्यांचे स्वरूप बदललेले आहे, पण पूर्वी तसे नव्हते.

अगदी छोट्या छोट्या गोष्टीत नजरेत भरेल अशी सामाजिक

बांधिलकी दृष्टोत्पत्तीस येत होती.उदा. मला आठवतो तो दर्जा

च्या बाहेर शेतांकडील रस्त्यावर असणाऱ्या “मरीमाय” या

देवतेचा उत्सव. मी लहान होते व या सर्व गोष्टींची तेव्हा मला

प्रचंड भीती वाटत असली तरी लांबून मी सगळं पहात होते,

अनुभवत होते. तेच मनावर खोल ठसलेले आहे.या उत्सवाच्या

किंवा इतरही कोणत्या असेल त्या उत्सवाच्या वेळी गावात

प्रचंड एकी होती. कदाचित माझ्या वडिलांच्या नेतृत्व गुणांचा

प्रभाव असेल “ राजा बोले दल हाले” असा माझ्या वडिलांच्या

नेतृत्वाखाली प्रत्येक सण समारंभ होत असे.

 

 

या” मरीमाय “च्या उत्सवाच्या वेळी गावात प्रचंड उत्साह संचारलेला दिसे. गावात घराघरात सुखशांती आरोग्य

नांदावे म्हणून देवतांचे उत्सव तेव्हा ही व आताही आपण साजरे

करतो.आधी सर्व ग्रामस्थांची (निवडक) मिटिंग होत असे व

कार्यक्रमाची दिशा ठरत असे. पुजा नैवेद्यासाठी व प्रसादासाठी

मोठ्या प्रमाणात अन्न शिजत असे. मग त्या साठी शिधा व वर्गणी गोळा होत असे ती फक्त तेल मीठा साठी. मोठ मोठी भांडी, तांब्या पितळेची होतीच. देवळाजवळ एक मोठा झोऱ्या अंथरलेला असे. आणि

मग गांवकरी आपल्या ऐपती प्रमाणे शिधा आणून त्यावर टाकत असत.जबरदस्ती नाही. तरी झोऱ्यावर जमलेला धान्याचा प्रचंड ढीग आता ही मला दिसतो आहे.आणि मग

मोठ्या प्रमाणात अन्न शिजवून सर्व गावाला त्याचा प्रसाद

म्हणून लाभ होत असे. तत्पूर्वी साफसफाई रंगरंगोटी करून

देवालय सजवले जात असे. अतिशय एकोप्याने मरीमायचा

उत्सव साजरा झालेला मला आठवतो.अर्थात नेतृत्व स्वच्छ

असेल तर नैतिकतेचा प्रभाव पडून लोक ऐकतात व कामे ही करतात, कारण त्यांना माहित होते की इथे,काणत्याही प्रकारची खाबूगिरी नाही.((आज आपण बघतो आहोत,

उत्सवांना किती बकाल व हिडिस स्वरूप आले आहे ते!))

पैशांना नुसता पूर येऊन त्याचे दुरूपयोग व दुष्परिणाम आपण

बघतो आहोत आता.का हरवली हो आमची संस्कृती संस्कार

एकोपा माणुसकी? माणूस इतका पराकोटीचा स्वार्थी का

बनला हो?

 

मला आठवते, झेंड्याजवळचे विठ्ठल मंदिर. कापडण्यातील

हे मंदिर खूप मध्यवर्ती जागी व अतिशय प्रशस्त आहे. उंच अशा मोठ्या जोतऱ्यावर ते स्थित असून एका बाजुला तेव्हा

मुलींची शाळा होती, जिथे मी पण शिकले नि परिक्षा ही दिल्या आहेत. इ.सहावी पर्यंत मी तिथे होते.

तर मंदिरा विषयी सांगत होते मी! खूप प्रसन्न व देखण्या

अशा मुर्ती लक्ष वेधून घेत असत.श्रावण महिन्यात बरेच उत्सव

इथे चालत असत. त्या निमित्ताने लहान मोठे साऱ्यांची हजेरी

लागे. कीर्तन भजन होत असे व एकूणच मोठा प्रसन्नतेचा व

आनंदाचा काळ म्हणजे तो श्रावण महिना असे.शिवाय तो बाजार पेठेचा ही भाग,मोठा गजबजलेला, कारण तिथेच झेंडा चौकही आहे आणि तिथेच भाजी बाजारही भरत असे.आमच्या

माळी वाड्यातल्या ताज्या भाज्या तिथे विक्रिला असत.भाजीवाले तिथे रस्त्यावर बसायचे. तुम्हाला आश्चर्य

वाटेल माझ्या लहानपणीच माझ्या वडिलांनी या भाजीवाल्यांसाठी चौथरे (ओटे)बांधून दिले आहेत व बाजारपेठ

नीट नेटकी कशी दिसेल याची काळजी घेतली होती. किती

आस्था व प्रेम होते बघा गावा विषयी! गाव म्हणजे जीव की प्राण, असा तो जमाना होता.मी सुद्धा झेंडा चौकात आई सांगेल त्या भाज्या आणायला जात असे. ती झेंडा गल्ली म्हणजे कापडण्याची बाजारपेठच आहे. कपड्यापासून सर्व

प्रकारची दुकाने तिथे आहेत. दहावी नंतर मी धुळ्याला गेले नि

गाव आता खूप विस्तारला आहे. पण खेदाने म्हणावेसे वाटते

की वडिल होते तेव्हा जी शिस्त होती ती आता नाही.वाट फुटेल

तसे गाव विस्तारले आहे. असो.

 

मला तर लहानपणच्या शेजारधर्म व सौहार्दाच्या इतक्या गोष्टी

आठवतात व त्या वेळच्या सर्वसमावेशक धोरण असलेल्या समाजाचे कौतुकही वाटते.एक साधी गोष्ट बघा,आमच्या शेजारी दुधदुभते होते. दोन्ही कडे बरं! ताक घुसळले की सर्वजण तिथे जाऊन ताक घेऊन जायचे. त्या दिवशी गोरगरिबांकडे घरोघर कढीचा दरवळ येत असे.मनसोक्त कढी

ओरपत सारेजण! माझ्या आईला काकू हाक मारून सांगत,

“बैन सुंदर, ताक लई जाय बरं, सरी जाई नही ते!”….

भाद्रपदात तर “भालदेव” ला आमच्या दोन घरात आरपार एक

कोनाडा होता त्यातून दह्याची बिटकी अलगद आमच्या घरात

येत असे. कुठे गेले हे सौहार्द? शेजारची माझी चुलत बहिण व

मी कायम एकमेकांच्या घरी सागरगोटे खेळत असू.आता कळते की, फार छान दिवस होते ते माझे कापडण्यातले !पण

आता उसासे टाकून परत थोडेच येणार आहेत ते!

“गेले ते दिन गेले

जणू सोन्याचे ते पेले

स्मृतीकोषी माझ्या दडूनी

ते पुन्हा उजागर झाले…

गेले ते दिन गेले…

 

धन्यवाद मंडळी,

भेटू पुन्हा पुढच्या रविवारी.. अशाच गप्पा मारायला..

हो, आपल्या जुन्या आठवणी हो..

 

जयहिंद.. जय महाराष्ट्र..

 

आपलीच ..

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

 

प्रतिक्रिया व्यक्त करा