*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री स्नेहा धोंडू नारींगणेकर लिखित अप्रतिम कथा*
*कृतज्ञता*
‘सुधा, अग ये सुधा” बाहेर ये लवकर. श्रीधरराव झोपाळ्यावर बसून सुधा ताईंना हाकावर हाका मारत होते.
*आले.. आले”
सुधा ताई हात कंबरेच्या रुमाला पुसत स्वयंपाक खोलीतून बाहेर येत म्हणाल्या.
“बसा बाईसाहेब”
खुर्चीकडे बोट दाखवत श्रीधरराव बोलले. “तुमचे चिरंजीव काय म्हणतात ऐका जरा, आपल्या नकळत ह्या दोघांनी आपला हा रहाता वाडा, शेतीवाडी, नारळ पोपळीच्या बागा, अगदी आंब्याची बाग सुद्धा विकली म्हणे परस्पर. ती सुद्धा कागदपत्र तुझ्या कपाटातून चोरून, त्यांना चांगली किंमत मिळाली म्हणे”.
काय ..? सर्व विकलं…? अरे मी तर सर्व कागदपत्रे बघायला दिली होती. आता आपण पिकलं पान आणि हे मुंबईकर.. यांना सर्व प्रॉपर्टी माहीत असणं गरजेचे आहे म्हणून मी दिली बघायला. आपल्या सर्व जागा जमीन दाखवल्या त्यांना, शेवटी सर्व त्यांनाच सांभाळायचं आहे ना..!
श्रीधर रावांनी डोक्यावर हात मारला..
आणि या तुझ्या दोन्ही कार्ट्यानी विचार न करता बायकांच्या नादी लागून सर्व प्रॉपर्टी आपला गावचा राजा खटखटे याच्या मदतीने विकली सुद्धा. एकदा बापाला विचारावं असं सुद्धा वाटलं नाही.
काय! हा वाडा सुद्धा!…
हो, काय म्हणायचे आहे तुला? श्रीधरराव जरा रागानेच विचारतात.
तसं नाही ‘बाबा ‘राजू मध्येच बोलला.
हो ! आई -बाबा त्यांना याच नावाने हाक मारायचे “राजू – मयूर”
पण बाबा, आम्ही ही जागा ज्या बिल्डरला विकली तो, एकाच कंपाउंड मध्ये जवळजवळ दोन बंगले देणार आहे. गार्डन ,स्विमिंग पूल अशा सर्वच सुख सुविधा पुरविणार आहे.
आणि आम्ही दोघांनी कुठे जायचे? बाबा मध्येच ओरडले.
शांतपणे मयू म्हणाला आई माझ्याकडे राहील तुम्ही राजू दादाकडे. आमचे दोघांचे बंगले एकाच कंपाउंड मध्ये असतील त्यामुळे तुम्हाला एकत्र भेटता येणार. शिवाय अवनी आणि आकाश वर पण लक्ष राहील.
आता मात्र बाबांना काय बोलावं सुचलं नाही. त्यांच्या दोन्ही मुलांनी परस्पर सर्व ठरवलं सुद्धा होतं.
आता त्यांच्या सुनबाई चित्रा आणि रेखा बोलल्या आम्हालाही थोडा मोकळा वेळ मिळेल, शिवाय नातवंडांवर आजी आजोबांचे संस्कार होतील.
बाबा उठले निमुटपणे बाहेर निघून गेले. सुधाताई मात्र सर्व गमावल्यासारख्या बसून राहिल्या.
पुढे चार दिवस मोठे विचित्र गेले.
आणि मग सकाळी सकाळी चहा पिताना बाबांनी सर्वांना बाहेर बोलावले. आपल्या हातातले वर्तमानपत्र बाजूला ठेवले, चष्मा काढला डोळे पुसले, परत चष्मा पुसून डोळ्यांवर चढवला. मग चहाचा घोट घेत त्यांनी आजूबाजूला पाहिले.
” राजू मयूर “बसा तुम्ही, चित्रा रेखा तुम्ही पण बसा, आणि हो सुधा बाईसाहेब तुम्ही पण.
सर्वजण आता बाबा काय म्हणतात , म्हणून पाहू लागले.
दीर्घ श्वास घेत बाबा बोलले , तुम्ही माझ्या नकळत सर्व व्यवहार केला काही हरकत नाही. तसंही आता हळूहळू या सर्व जबाबदाऱ्यातून मोकळं व्हायचं आहे. जे आम्ही तुम्हाला सन्मानाने दिले असते ते तुम्ही हिसकावून घेतला. जे तुमचं होतं, हक्काचं ते ओरबाडून विकला.
आता ऐका, मी क्राईम ब्रँचचा रिटायर्ड आयपीएस ऑफिसर होतो. अनेक गुन्हेगारांना मी पाणी पाजलं. पण माझ्याच घरात माझ्या स्वतःच्या मुलांनी मला हातोहात फसवलं. असू द्या…
पण एक लक्षात घ्या, आत्ताही मी एक फोन फिरवून सर्व चित्र बदलू शकतो. पहायचं आहे का तुम्हाला?
सर्वांच्या माना खाली झाल्या.
या घ्या चाव्या, तिजोरीच्या आहेत, वाड्याच्या आहेत, माझ्या उरल्या सुरल्या सर्व संपत्तीच्या आहेत. आजच दुपारी आम्ही दोघं पुण्याला म्हणजे शिवापूरला जात आहोत.
शिवापूरला ! कोणाकडे ? सर्वांनी एका सुरात विचारलं.
आहे माझा एक खास दोस्त . तेवढ्यात वाड्याच्या आवारात एक अलिशान गाडी थांबली. नितेश आणि संध्या खाली उतरले. बाबा काही बोलायच्या आतच त्या दोघांनी त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला.
साहेब..! अगदी कृतज्ञतेने म्हणत नितेश खुर्चीत बसला.
‘राजू , मयूर’ हाच माझा दोस्त आहे.
ते दोघे आ वासून पाहतच राहतात. कारण ज्या व्यक्तीला त्यांनी सर्व विकलं होतं आणि जो त्यांना सर्व सुख सोयींनी युक्त असलेले बंगले देणार होता, तो तोच नितेश कुमार होता.
नितेश उठला अस्वस्थपणे त्याने दोन येरझऱ्या घातल्या. मग त्याने बसत परत बोलायला सुरुवात केली.
मी मुंबईचा एक कुप्रसिद्ध गुंड होतो. दया माया माझ्या ठिकाणी काहीच नव्हती. मारामाऱ्या, गुंडगिरी ,सुपारी घेण्यापासून सर्वच वाईट कामे मी करायचो अशाच एका चकमकीत साहेबांशी पंगा पडला आणि या देवदूताने मला नित्याचा नितेश बनवला. आता मी मुंबई मधला फार मोठा बिल्डर आहे. मेहनतीने कमावतो, प्रामाणिक म्हणून तुम्ही पण मला ओळखता.
नितेश श्रीधररावांच्या पायांना स्पर्श करत मोठ्या कृतज्ञतेने म्हणतो… आज मी जो आहे तो याच देवदूतामुळे..! माझ्यासारखे 100 नितेश मी या माणसावर कुर्बान करीन. आणि ही माझी पत्नी ‘संध्या. ‘साहेबांची मानलेली मुलगी. जिला असंच दुर्दैवी फेऱ्यातून साहेबांनी बाहेर काढलं.
तुम्ही मोठे भाग्यवान म्हणून त्यांच्या पोटी तुमचा जन्म झाला .परमेश्वराने तुम्हाला हे मातृ-पितृछत्र दिले.
पण आम्ही खरे भाग्यवान कारण वाटेवरच्या वाटसरूना त्यांनी आपलं म्हटलं. आम्ही त्यांच्या प्रती कृतज्ञ तर आहोतच, पण त्या जन्म देणाऱ्या परमेश्वराचे पण आभारी आहोत. कारण त्याने आमची गाठ अशा माणसाशी करून दिली.
नितेश उठला गाडीत जाऊन त्याने बॅग आणली. त्यातून कागदपत्रे आणि चाव्या काढून त्यांनी टेबलावर ठेवल्या.
तुमच्या जमिनीची वाड्याची सर्व कागदपत्रे आहेत, तपासून घ्या.
या दोन चाव्या तुमच्या बंगल्याच्या.
सुधाताई कॉफी घेऊन बाहेर आल्या.
सर्वांनीच पोटभर नाश्ता केला कॉफी पिली..
तर काय सुधाबाई आता निघायचं ना?
हो, म्हणत त्या फक्त हसल्या.
मयूर राजू आई बाबा म्हणत रडू लागले अगदी लहान मुलाप्रमाणे. नका जाऊ म्हणून विनंती करू लागले. चित्रा, रेखा पण हात जोडून विनंती करू लागल्या.
आई बाबांनी नितेश संध्याकडे कृतज्ञतेने पाहिले. नंतर सारं काही आपल्या मुलांच्या सुनांच्या ताब्यात देऊन जाऊन गाडीत बसले.
गाडी निघाली दोघांनीही हात हलवले.
गेटपाशी उभे राहून जाणाऱ्या गाडीकडे चौघेही पाहत होते. डोळ्यात अश्रू होते कृतज्ञतेच्या भावनेने हेलावले होते.
सौ, स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग