*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*
*’तरंग’*
वेळोवेळी ‘स्वसंवाद’, आणि ‘मनातलं काही’ या दोन्ही लेखमालेला तुमचा भरभरून प्रतिसाद लाभला, त्याबद्दल रसिक वाचकांच्या कायम ऋणातच राहायला आवडेल. आता या वर्षीही माझ्या मनातले ‘तरंग’ तुमच्यासमोर घेऊन येते आहे त्याच प्रेमाच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
#सखी_संवादिनी
बोल ना
काय बोलू ?
काहीही,तुझ्या मनातलं.
सुखावर बोलू का दुःखावर?
सुखावरही नको आणि दुःखावरही नको.
सुखाची वळणं क्षणभराची असतात. दुःखाची दरी खोल आहे पण अनंत नाही. कधीतरी सरळ रस्ता लागतोच लागतोच ना, ते सोडून बोल.
ठीक आहे, आपण प्रेम नाही तर विरहाबद्दल बोलूया.
मी तर म्हणेन प्रेम आणि विरह या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला एकच एक बाजू कधीही निवडता येणार नाही. प्रेमाचे तीन अंक संपले की विरहाची एन्ट्री झालीच म्हणून समजा. तर त्यावरही नको बोलायला.
मग जगण्यावर बोलूया? का मरण्याबद्दल ठीक आहे?
अगं, जगणं आणि मरणं या दोन ओळींच्या मधली रिकामी जागा म्हणजेच आयुष्य नाही का? आता तेही ऐकावसं वाटत नाही. लोकांनी चाऊन चोथा केलाय हा विषय.
असं काय बरं? हे सगळे विषय काढून टाकले तर मी बोलू कशाबद्दल? ‘मी’, ‘माझं’ अस्तित्वंच काय या वाचून? मी पूर्ण रितीच होऊन जाईल ना मग?
तेच! तेच रितेपण सुंदर वाटतं मला. ना सुख ना दुःखं, ना प्रेम ना विरह,ना जन्म ना मृत्यू… कुठल्याच विषयाचं लेबल नसावं असं रितेपण.
दोन श्वासांमधला रिता क्षण!
काहीतरी तरल जे तुझ्या नकळत तुझ्या जाणीवांमध्ये अलगद उगवून येतंय, तू ‘तू’ म्हणून तुझं अस्तित्व विसरून जातेस अशी एक नितांत रमणीय वेळ ….त्याबद्दल बोलूया.
मला वाटतं बोलायची ही गरज आता कुठे उरली आहे. बस् फक्त हा अनुभव घे. आपल्या दोघींच्या अंतर्मनाचे प्रवाह अगदी जुळून आलेत, एका रेषेत लयबद्धतेने चाललेत. आजूबाजूला फक्त अल्हाददायक धुकं पसरल्यासारखं वाटतंय पण दिसत काहीच नाही.
दंवभरल्या गवतांवर आपसुकच पाय पडून तो ओला झालाय, रानातल्या पानाफुलांचा काहीसा उग्र काहीसा मंद अशा विलक्षण सुगंधाचा दरवळ श्वासांना जाणवतोय.
असं वाटतंय की काळही थांबलाय आपल्यासाठी. आणखी काही नको बस् ते तन्मय होणं हीच सुंदर अवस्था, अपूर्ण तरीही परिपूर्ण!
ही क्षणाची समाधी
हे क्षणाचं निवर्तलेपण
हे क्षणाचं ‘स्व’शी तादात्म्य.
चल, या क्षणांत मिसळून जाऊयात. जमलच तर पाहूयात त्यात_ रेंगाळल्यात का मागे आपल्याला ‘त्या’नंच सुचवलेल्या काही ओळी…
अंजली दीक्षित-पंडित
९८३४६७९५९६