You are currently viewing सावंतवाडी वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती मळगावमार्फत वन वणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा

सावंतवाडी वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती मळगावमार्फत वन वणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा

सावंतवाडी  :

महाराष्ट्र शासन, वनविभागाकडून दर वर्षी दिनांक 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान वन वणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा करण्यात येतो. यादरम्यान वन वणव्यामुळे पर्यवरणावर होणारे दुष्परिणाम व वन वणवा रोखण्यासाठी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाते. याअंतर्गत काल सायंकाळी मळगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये सावंतवाडी परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी उपस्थित राहून मळगाव ग्रामस्थांशी वन वणव्यामुळे होणारे दुष्परिणाम व वणवा रोखण्याबाबतच्या उपाययोजना यावर सविस्तरपणे चर्चा केली. संयुक्त वन व्यवस्थापन समिती मळगावचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी दरवर्षी प्रमाणे आपण सर्वजण वन वणवा रोखण्यासाठी कटीबद्ध असलेबाबत प्रतिपादन केले.
वन वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल संपत्तीची हानी होऊन त्याचे निसर्गावर होणारे दृश्य व अदृश्य दुष्परिणाम अमाप आहेत. वणव्यामुळे सरपटणारे वन्यजीव, उभयचर प्राणी, पक्ष्यांची घरटी, अंडी जळून खाक होतात. झाडे, झुडपे, वन्यजीवांचे अधिवास नष्ट होतात. ज्यामुळे गवा, बिबट, शेकरू, माकड, सांबर इत्यादी वन्यजीव मानवी वस्तीमध्ये तसेच शेतबागायतीमध्ये स्थलांतरित होतात ज्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत जातो. या सर्व दुष्परिणामांचा विचार करता वन वणवा रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी वन विभागास सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. एस. नवकिशोर रेड्डी यांचेकडून करण्यात येत आहे.
संयुक्त वनव्यवस्थापन समिती मळगाव यांनी आजवर वन वणवा रोखण्यासाठी वन विभागाला मोलाचे योगदान दिलेले आहे. या दिलेल्या सामुदायिक योगदानाबद्दल वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी मळगाव ग्रामस्थांचे आभार मानले. सदरच्या वन वणवा जनजागृती सभा पार पाडण्यासाठी मळगावचे वनपाल विजय पांचाळ, वनरक्षक प्रकाश राणगिरे, रमेश पाटील, रामचंद्र रेडकर यांचेसोबतच मळगावचे प्रभारी सरपंच श्री.हनुमंत पेडणेकर, गुरुनाथ गावकर, विजयानंद नाईक, गणेशप्रसाद पेडणेकर, गजानन सातार्डेकर तसेच इतर सन्माननीय मळगाव ग्रामस्थ यांनी मोलाचा वाटा उचलला.

प्रतिक्रिया व्यक्त करा