*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आयुष्य हेच आहे…*
आयुष्य हेच आहे स्वीकार तू एकदा
खटपटी कशाला ही मानून आपदा…
सुखदु:ख खेळ संपलाच नाही कधी
फुफाट धावते हो दु:खाचीच नदी
सुख “जवा”पाडे येथे नियम सर्वदा
आयुष्य हेच आहे स्वीकार तू एकदा …
सुटले ना कोणी बघ दु:ख मिठीतून
कधी सावली तर कधी असते रे ऊन
देव नाही सुटले झेलल्यात आपदा
आयुष्य हेच आहे स्वीकार तू एकदा ….
सीता सती द्रौपदी अहल्या ती झाशी
क्रांतिवीर गेले हसत हसत फाशी
इवलाल्या दु:खाची कर होळी सर्वथा
आयुष्य हेच आहे स्वीकार तू एकदा…
जगावे पहा हसत हसत मरावे
जमले तर थोडे कीर्तिरूप उरावे
उराशी धरावे दीन दलितांना सदा
आयुष्य हेच आहे स्वीकार तू एकदा…
प्रा.सौ.सुमती पवार UK
(९७६३६०५६४२)