पोलीस हवालदार राजेंद्र गोसावी यांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
स्वतःचा जीव धोक्यात घालून वृद्ध महिला आणि छोट्या मुलीचे वाचवले होते प्राण
मालवण
मालवण तालुक्यातील काळसे गावचे सुपुत्र तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलात जिल्हा विशेष शाखेत हवालदार पदावर कार्यरत असलेले कर्तव्यतत्पर पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र चंद्रकांत गोसावी यांचा आज प्रजासत्ताक दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते साहसी कामगिरीबद्दल प्रशंसापत्र आणि पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल , जिल्हाधिकारी किशोर तावडे ,अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले आणि इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
पोलीस हवालदार राजेंद्र चंद्रकांत गोसावी यांनी २ जानेवारी २०२४ रोजी पहाटे ३:१५ वाजता कुडाळ रेल्वेस्टेशन येथे मडगांव पनवेल हॉलिडे ट्रेनमध्ये ७३ वर्षीय वृद्ध महिला व एक ९ वर्षीय मुलगी चढत असताना ट्रेन चालू होऊन वेगात पुढे जावू लागली व त्यांना ट्रेनमध्ये चढणे शक्य न झाल्याने ते दोघेही ट्रेनच्या दरवाजात लटकत असताना राजेंद्र गोसावी यांनी प्रसंगावधान राखून आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांच्याकडे धावत जात प्रथम लहान मुलीस ट्रेनमध्ये आत सरकवले व वृद्ध महिलेस आपल्या अंगावर झेलून तिला सुखरूप बाहेर उतरवून दोघांचेही प्राण वाचवले आणि ट्रेन थांबवून दोघांनाही ट्रेनमधील त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देवून त्यांना मार्गस्थ केले. राजेंद्र गोसावी ही कामगिरी सिंधुदुर्ग पोलीस दलासाठी अभिमानाची आणि कौतुकास्पद असल्याने हवालदार राजेंद्र गोसावी यांचा सिंधुदुर्ग नगरी येथे पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग च्या वतीने आज प्रजासत्ताक दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देउन सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री यांनी राजेंद्र गोसावी यांच्या शौर्याचे कौतुक केले. राजेंद्र गोसावी यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.