You are currently viewing प्रशासनाच्या कार्यपद्धती चा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्याकडून निषेध

प्रशासनाच्या कार्यपद्धती चा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्याकडून निषेध

इळये ग्रामपंचायत विहीर प्रकरणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी व म्हापसेकर यांच्यात खडाजंगी

सिंधूदुर्गनगरी

देवगड तालुक्यातील इळये ग्राम पंचायतीने विहिरिसाठी झालेल्या खर्चापेक्षा जास्त निधी दिल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, सबंधित ग्राम पंचायत तेवढ्या रक्कमेत काम करून देण्यास तयार असल्याने प्रशासनाने थोडी लवचिकता दाखवावी, अशी भूमिका पूर्ण सभागृहाने घेतली. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यासाठी तयार नसल्याने डॉ वसेकर व उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. प्रशासनाने यापूर्वी झालेल्या अनियमितता प्रकरणी किती जणांवर कारवाई केली ? असा प्रश्न करीत प्रशासन सभापतींना किंमतच देत नाहीत असा आरोप करीत आपण याचा निषेध करतो, असे सांगितले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभां बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष म्हापसेकर, सीईओ डॉ वसेकर, विषय समिती सभापती रविंद्र जठार, सावी लोके, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे, सभा सचिव तथा सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सत्ताधारी गटनेते रणजीत देसाई, विरोधी गटनेते नागेंद्र परब, रेश्मा सावंत, संजना सावंत, संतोष साटविलकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. इळये ग्राम पंचायतींने राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर झालेल्या विहिरीचे ७५ हजार रूपयांचे काम झालेले असताना चार लाख रूपयांचा निधी ठेकेदाराला दिला. त्याबाबत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने वारंवार सुचना देवूनही अतिरिक्त रक्कम भरणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने नोटिस बजावली. याबाबत रणजीत देसाई व म्हापसेकर यानी विषय काढत सबंधित ठेकेदार व ग्राम पंचायत जुन्याच अंदाजपत्रकाप्रमाणे आठ दिवसांत काम करून देण्यास तयार आहे. त्यामुळे प्रशासनाने लवचिक भूमिका घ्यावी, असे मत मांडले. त्याला सत्ताधारी अंकुश जाधव, शिवसेनेचे प्रदीप नारकर यानीही पाठिबा दिला. मात्र, सीईओ वसेकर यानी हा आर्थिक अनियमिततेचा विषय आहे. यापूर्वी आम्ही त्यांना संधी दिली होती, असे सूचक वक्तव्य केले. त्यावर उपाध्यक्ष म्हापसेकर व अंकुश जाधव यानी आक्रमक होत यापूर्वी अनियमितता झालेल्या किती व्यक्तीवर कारवाई केलात ? असा प्रश्न करीत आरोग्य विभागाने हापकीन या संस्थेला कोटयांनी रुपये देवून अनेक वर्षे उलटली. तरी त्यांनी साहित्याचा पुरवठा केलेला नाही. त्यांच्यावर का कारवाई केली नाही, असा प्रश्न केला. यावेळी म्हापसेकर यानी खातेप्रमुख सभापातींना किंमत देत नाहीत. त्यामुळे मी त्याचा निषेध करतो, असे सांगितले. तर अंकुश जाधव यानी ही नारायण राणे यांच्या विचारांची जिल्हा परिषद आहे. येथे कोणावर अन्याय होवू दिला जाणार नाही, असा इशारा दिला. यावेळी सर्वच सभागृहाच्या भावना या इळये ग्राम पंचायत बाबत लवचिक धोरण ठेवण्याच्या आहेत. त्यामुळे त्याचा आदर करावा, असे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा