सिंधुदुर्गनगरी
बहुप्रतिक्षीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जिल्हा प्रशासनाने नियोजन पूर्ण केले आहे. त्या अनुषंगाने लस देण्याबाबतचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. याविषयी जिल्हाधिकारी यांनी आज सविस्तर आढावा घेऊन सूचना दिल्या. जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना प्रथम लस देण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई नर्सिंग ॲक्ट अंतर्गत खआजगी नोंदणीकृत डॉक्टर्स आणि त्यांचे कर्मचारी यांना, खाजगी डॉक्टर्स आणि त्यांचे कर्मचारी यांना, कोविड संदर्भात काम केलेल्या प्रशासनिक अधिकारी आणि कर्मचारी यांना, 50 वर्षावरील व असांसर्गिक आजारी असलेल्या व्यक्ती याप्रमाणे प्राधान्य क्रम ठरविण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण 58 शआसकीय आरोग्य संस्ता आणि त्यात कार्यरत 5हजार 33 अधिकारी, कर्मचारी नोंद केलेले आहेत. मुंबई नर्सिंग ॲक्ट अंतर्गत खाजगी नोंदणीकृत 84 दवाखान्यातील डॉक्टर्स आणि त्यांचे कर्मचारी मिळून 1 हजार 72 व्यक्ती नोंदलेल्या आहेत. तसेच खाजगी रित्या वैद्यकिय सेवा देत असलेल्या 569 दवाखान्यातील डॉक्टर्स आणि त्यांचे कर्मचारी काम करीत असून सर्वांना प्राधान्याने लस टोचणेत येणार आहे. यानंतर कोविड संदर्भात काम केलेल्या प्रशासनिक अधिकारी आणि कर्मचारी, त्यानंतर 50 वर्षावरील अधिक इतर असांसर्गिक आजारी असलेल्या व्यक्तींना टप्प्या टप्प्याने लस टोचण्यात येणार आहे. तसेच या प्राधान्यक्रमानंतर सर्वसामान्य नागरिकांना टप्प्या टप्प्याने लस टोचण्यात येणार आहे.
लसीकरण कार्यक्रमासाठी शासनाने संकेतस्थळ तयार केले अशून त्यात नोंद असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी याना लस देण्यात येणार आहे. लस साठवणुकीसाठी आवश्यक शितसाखळी पुरेशी व्यवस्था केली आहे. तसेच लस टोचणीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.