इचलकरंजीत श्रीरामल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शोभायात्रा
इचलकरंजी : प्रतिनिधी
अयोध्या येथे संपन्न होत असलेल्या भव्यदिव्य अशा श्रीरामल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे रविवार 21 जानेवारी रोजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळामारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने भव्य अशी शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
रामजन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण देश राममय झाला आहे. यानिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांचे मार्गदर्शन व सहकार्याने इचलकरंजी येथील श्री काळामारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने शोभायात्रा व पालखी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री काळा मारुती मंदिर (आयजीएम परिसर) येथे आरती व पालखी पुजन होऊन शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर ही शोभायात्रा आ. रा. पाटील शाळा, काजवे हॉस्पिटल, श्री शिवतीर्थ, कॉ. मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा, झेंडा चौक, गुजरी कॉर्नर मार्गे गावभागातील राम जानकी मंदिर येथे आल्यानंतर शोभायात्रेची सांगता होईल. यावेळी रामजानकी मंदिर येथे महाआरती करण्यात येणार आहे.
या शोभायात्रा व पालखी मिरवणूकीत झांजपथक, लेझीम पथकल धनगरी ढोलसह विविध प्रकारच्या पारंपारिक वाद्यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर राम-लक्ष्मण-सिता यांची वेशभूषा, भव्य रथ असणार आहे. तर शोभायात्रा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी रेखाटली जाणार आहे. या भव्यदिव्य शोभायात्रेत इचलकरंजी शहर व परिसरासह सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नशील : आमदार आवाडे
इचलकरंजी : प्रतिनिधी
जीवाची पर्वा न करता घरोघरी जावून माहिती गोळा करण्याचे काम करण्यासह शासकीय योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहचविणार्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना मानधन वाढ मिळालीच पाहिजे. या संदर्भात आपण विधानसभेत आवाज उठविला असून मानधनात वाढ मिळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी शिष्टमंडळाशी बोलताना दिली.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणारे मानधन तुटपुंजे असून शासन त्यांना शासकीय कर्मचार्याचा दर्जाही देत नाही. त्यामुळे कायद्याचे संरक्षण, महागाई भत्ता यासह अन्य लाभही मिळत नाहीत. परिणामी अंगणवाडी कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतनश्रेणी, भत्ते, पूर्वलक्षीप्रभावाने द्यावेत, इतर राज्यातील अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन द्यावे, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, लोकसंख्या वाढलेल्या भागात नवीन अंगणवाडी सुरू करावी यासह विविध मागण्या प्रलंबित असून त्याच्या पूर्ततेसाठी 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन हा प्रश्न शासन दरबारी मांडून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
चर्चेनंतर बोलताना आमदार आवाडे यांनी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स यांच्या मानधनात वाढ होणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. मानधन वाढ झालीच पाहिजे या मतावर मी आजही ठाम असून हा प्रश्न शासन दरबारी मांडून तो सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे, सचिव सुवर्णा तळेकर आणि संघटक सुनिल बारवाडे आदी उपस्थित होते.