आरोग्य सभापती ॲड.परिमल नाईक
सावंतवाडीतील ऐतिहासिक मोती तलाव म्हणजे शहरासाठी भूषण. मोती तलावामुळेच सावंतवाडी शहराच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. सावंतवाडीला नैसर्गिकरित्या सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या या मोती तलावात काही विघ्नसंतोषी, बेजबाबदार, असंस्कृत लोक कचरा टाकतात, दारूच्या, बियरच्या रिकामी बाटल्या फेकून स्वतःचे संस्कार दाखवून देतात. त्यामुळे तलावाच्या स्वच्छतेच्या कामात अडथळे निर्माण होतात परिणामी तलावाचे सौंदर्य नाश पावते, पाणी अस्वच्छ होते आणि पाण्याला दुर्गंधी देखील येते. सदरचे प्रकार हे समाजविघातक असून संबंधितांविरुद्ध यापुढे दंड आकारून कडक कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य सभापती अड.परिमल नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
सावंतवाडी नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या स्पर्धेत सहभागी असून केवळ नगरपालिकेने स्वच्छता करून किंवा स्वच्छतेविषयक कारवाई व उपाययोजनावर अवलंबून शहर स्वच्छ होणार नसून प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक बांधिलकी जपून आपला जिव्हाळ्याचा व कौटुंबिक विषय मानून या अभियानात सहभागी झाले पाहिजे. सावंतवाडीतील नागरिक हे केवळ सुशिक्षित नसून सुसंस्कृत व सुज्ञ आहेत. यापूर्वी देखील सावंतवाडी पालिकेने स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळविलेले आहेत. त्यामुळे यावेळी देखील फक्त पुरस्कारासाठी नव्हे तर आपलं शहर स्वच्छ राखून शहराची प्रतिमा राज्यात, देशात उंचावावी यासाठी प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.
शहराचे वैभव राखण्यासाठी सावंतवाडीचा चेहरा म्हणून ज्याची ओळख होते ते मोती तलाव कचरामुक्त ठेवण्यासाठी सावंतवाडीकरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि समाजविघातक प्रवृत्तींना अद्दल घडवून आपण स्वच्छ सर्वेक्षणात अग्रक्रम प्राप्त करू याबाबत तिळमात्र शंका नाही. स्वच्छ सर्वेक्षणात सावंतवाडीचे नाव अग्रक्रमाने येण्यासाठी व सावंतवाडीची शान असलेल्या मोती तलावाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, गैरकृत्य करताना कोणीही आढळल्यास त्याचा फोटो काढून त्वरित नगरपरिषद भ्रमणध्वनी क्र. ८००७३३०४०४/७७४४९४६५१४ वर संपर्क साधून माहिती द्यावी जेणेकरून तात्काळ कारवाई करण्यास मदत होईल.