You are currently viewing जिल्हा व्यापारी महासंघाकडून दोन नवे पुरस्कार जाहीर…

जिल्हा व्यापारी महासंघाकडून दोन नवे पुरस्कार जाहीर…

जिल्हा व्यापारी महासंघाकडून दोन नवे पुरस्कार जाहीर – नितीन वाळके

मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा व्यपारी महासंघातर्फे दरवर्षी व्यापारी एकता मेळाव्यात पाच पुरस्कार देण्यात येतात. मात्र यावर्षी मालवण येथे ३१ जानेवारीला होणाऱ्या व्यापारी मेळाव्यापासून नव्याने दोन पुरस्कारांची भर पडणार आहे. यावर्षी कै. भाईसाहेब भोगले स्मृती आदर्श युवा उद्योजक पुरस्कार व सेवाव्रती स्व. बापू नाईक स्वयंसिद्ध नवउद्यमी पुरस्कार असे दोन नवे पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

मालवण येथील व्यापारी मेळावा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नितीन वाळके हे बोलत होते. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन तायशेटे, दीपक भोगले आदी उपस्थित होते.

यावेळी नितीन वाळके म्हणाले, जिल्हा व्यापारी महासंघाच्या दरवर्षी होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यात ज्येष्ठ व्यापारी जीवन गौरव पुरस्कार, माई ओरसकर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार, प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट व्यापारी संघ तालुकाध्यक्ष पुरस्कार व कै. उमेश विष्णू शिरसाट स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार असे पाच पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी आणखी दोन नवे पुरस्कार देण्यात येणार आहेत. व्यापारी महासंघासाठी नेहमीच पडद्या मागे राहून महासंघाची वाटचाल योग्य व सुरळीत होण्यासाठी नेतृत्व केलेले कै. भाईसाहेब भोगले यांच्या स्मरणार्थ मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिल्या पिढीत स्वतःच्या कर्तृत्वावर व्यापार विकसित करणाऱ्या युवा व्यापाऱ्याला स्व. भाईसाहेब भोगले स्मृती आदर्श युवा उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर कुडाळचे ज्येष्ठ उद्योजक व व्यापारी स्व. बापू नाईक यांच्या स्मरणार्थ पर्यटन व अतिथ्यशीलता म्हणजेच हॉस्पिटॅलिटी उद्योगात उत्तम कामगिरी करणाऱ्या नव उद्योजकाला सेवाव्रती स्व. बापू नाईक स्वयंसिद्ध नवउद्यमी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

मालवणात होणाऱ्या व्यापारी मेळाव्यापासून हे दोन नवे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या सर्व पुरस्कारांसाठी व्यापारी महासंघाची निवड समिती गठीत करण्यात आली असून लवकरच या पुरस्कारांचे विजेते जाहीर केले जातील, अशी माहितीही नितीन वाळके यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा