पुणे :
ज्येष्ठ प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वरयोगिनी प्रभा अत्रे (९२) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यासाठी त्या सध्या युट्यूबच्या माध्यमातून काम करत होत्या. त्यांना हृदयविकाराचा झटका आला म्हणून खासगी रूग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते आल्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जात होत्या. त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या. भारत सरकारने त्यांना संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये “पद्मश्री” आणि २००२ मध्ये “पद्मभूषण” पुरस्काराने सन्मानित केले होते. हे पुरस्कार भारतातील अनुक्रमे चौथ्या तिसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. तसेच २०२२ मध्ये “पद्मविभूषण” देऊन त्यांचा गौरव केला. हा भारतरत्न नंंतर सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याच्या कार्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. ’स्वरमयी’, ‘सुस्वराली’, ‘‘स्वरांगिणी’, ‘स्वररंजिनी’ या संशोधनपर संगीतविषयक पुस्तकांसह ‘अंत:स्वर’ या काव्यसंग्रहाचे लेखन त्यांनी केले. पुण्यात ‘स्वरमयी गुरुकुल’ संस्थेची स्थापना करून त्यांनी त्याद्वारे पारंपरिक गुरु-शिष्य शैलीतील संगीत शिक्षण व समकालीन संगीत शिक्षणाचा मेळ घातला. या संस्थेमार्फत, प्रभा अत्रे फाउंडेशनद्वारा अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.