पुणे:
देशाच्या इतिहासात एक दंतकथा बनून राहिलेले साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी सौ.रजनीदेवी पाटील (वय ७६) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पुणे येथील रुग्णालयात गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मोदी लाटेत देखील सातारच्या गादीचे राजे उदयनराजे भोसले यांचा दणदणीत पराभव करत शरद पवार यांचा शब्द राखणारे श्रीनिवास पाटील यांचा विजय म्हणजे दंतकथा होती. वयाच्या ७८ व्या वर्षी देखील योद्ध्यासारखे लढणारे श्रीनिवास पाटील आजही प्रत्येकाच्या लक्षात राहिले ते शरद पवारांच्या भर पावसातील सभेमुळेच. शेतकरी कुटुंब ते सनदी अधिकारी, खासदार, माजी राज्यपाल, पुन्हा खासदार असा प्रवास करणाऱ्या श्रीनिवास पाटील यांच्या अर्धांगिनी सौ. रजनीदेवी यांच्या निधनामुळे आज त्यांच्या कुटुंबावर आणि मतदारसंघावर शोककळा पसरली.