*अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या
अर्चनाताई घारे-परब यांचे तहसिलदारांना निवेदन सादर
सावंतवाडी
अवकाळी पावसाने कोकणातील नुकसान झालेल्या आंबा आणि काजूच्या बागांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चनाताई घारे-परब यांनी तहसिलदार यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
काल दिनांक ६ जानेवारी २०२४ म्हणजे सोमवारी कोकणातील विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण ढगाळ असून सावंतवाडी येथे अनेक ठिकाणी पाऊसही पडलेला आहे. सावंतवाडी परिसरातील महत्त्वाचे पीक आंबा व काजू याची मोहर प्रक्रिया सुरु होण्याच्या कालावधीमध्ये थंडी न पडता या ढगाळ वातावरणामुळे रोगराईची वाढ होत असून शेतकरी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.तरी कोकणातील शेतकऱ्याला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू ची नुकसान भरपाई मिळण्याकरता त्वरित पाहणी करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व संपूर्ण कर्जमाफी करणेत यावी अशी मागणी या पत्रातून अर्चनाताई यांनी केली आहे. तहसीलदार श्रीधर पाटील यानी संबंधित विभागाला त्वरित आदेश लगेचच दिले. यावेळी रेवती राणे, जिल्हा महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुंडलिक दळवी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , सुधा सावंत युवती अध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेस, मारीता फर्नाडिस अल्पसंख्याक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काशिनाथ दुभाषी, झहूर खान, पूजा दळवी, उल्हास सावंत शिवसेना पदाधिकारी, गंगाराम परब, योगेश साळगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.