You are currently viewing कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

सिंधुदुर्गनगरी

पिडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यापासून त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळवून देणे, ज्या आरोपींनी अपराध केलेला आहे, अपराध केल्याचा पुरावा आहे व तो आरोपी कायद्याने शिक्षापत्र आहे, अशा अपराध्याला सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर शिक्षा होणे, गुन्हयांच्या दोषसिद्धीचे प्रमाणात वाढ होणे आवश्यक आहे. गुन्ह्यातील तपासामध्ये सबळ वैदयकिय पुरावे प्राप्त होण्यासाठी तसेच इतर प्रशासकीय विभागाकडील दस्तऐवज सक्षमपणे दोषारोपपत्रासह  न्यायालयात सादर करण्यासाठी  पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून दि. 04/01/2024 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे अधिनस्त येणारे जिल्हयातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा नगरविकास अधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेसाठी तसेच, जिल्हयातील उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार, पोलीस अधीक्षक कार्यालय अधिनस्थ सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार, कोर्ट पैरवी अधिकारी यांचेसाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा व चर्चासत्र जिल्हा होमगार्ड समादेशक कार्यालय, सिंधुदुर्ग येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेली होती.

सदर कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल डॉ. आर. एस. कुलकर्णी, माजी वैद्यकीय संचालक, महाराष्ट्र राज्य तथा वैद्यकीय अधीक्षक, SSPM वैदयकीय महाविद्यालय, पडवे, ता. कुडाळ, डॉ. संतोष फुपरे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग, डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग, अॅड. गजानन तोडकरी, सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोक्ता, सिंधुदुर्ग, अॅड रुपेश देसाई, अतिरीक्त सरकारी अभियोक्ता, सिंधुदुर्ग यांनीही आरोपीविरुद्ध न्यायालयात सादर करण्यात येणारी वैदयकीय प्रमाणपत्रे तसेच दस्तऐवज गांभीर्यपूर्वक, सबळ व संशयाच्या पलिकडे सादर करण्याबाबत तसेच, न्यायालयात साक्ष देताना घ्यावयाची दक्षता इत्यादीबाबत मार्गदर्शन केले. पोलीस तपासात पोलीस अधिकारी यांना आणि खटला चालविताना सरकारी अभियोक्ता यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करुन सर्वांना परिपूर्ण माहिती दिली.

उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी यांनी अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित केल्यामुळे पोलीस विभागाचे आभार मानले. तसेच कार्यशाळेचा उद्देश सफल करुन एकजूटीने, एकमेकांच्या समन्वयाने काम करुन गुन्हयांच्या शिक्षेच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी निश्चितच प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी उपस्थित मान्यवर, सरकारी अभियोक्ता, वैदयकिय अधिकारी, इतर प्रशासकीय विभागाचे अधिकारी यांचे आभार व्यक्त केले. तसेच, सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधून गुन्हयांची दोषसिद्धी वाढविणे व पिडित व्यक्ती, सर्वसामान्य नागरीकांना न्याय मिळवून देण्याची कर्तव्यभावना व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा