इचलकरंजी :
इचलकरंजी येथे मंगलमय वातावरणात भव्य कलश यात्रेने 108 कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याला प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेला रथ, सवाद्य निघालेल्या कलश यात्रेत डोक्यावर कळस घेऊन हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. लालभडक भगव्या रंगाच्या एकसारख्या साड्या परिधान केलेल्या महिलांचा सहभाग कलश यात्रेत लक्षवेधी ठरला. लक्ष्मीनारायण मंदिर झेंडा चौक ते श्री.पंचगंगा विनायक मंदिर तीन किमी प्रमुख मार्गावर धार्मिक वातावरणात यात्रा काढण्यात आली.
इचलकरंजी येथील पंचगंगा नदी काठावर महाराष्ट्रात प्रथमच होणारा भव्य 108 गणपती महायज्ञ सोहळा आयोजित केला आहे. धार्मिक कार्यक्रमाचे परिपूर्ण महायज्ञ सोहळ्याची सुरुवात आज भव्य कलश यात्रेने झाली. कलेशात्रेची संपूर्ण तयारी शिवराणा गोसेवा, श्याम मित्र परिवार व बरसाना महिला मंडळाने केली होती. फुलांनी सजवलेल्या रथात श्री श्री 108 सितारामदास महाराज, यज्ञाचार्य पंडित चिरंजीव शास्त्री, पंडित अक्षयजी गौड, संवित कैलाशचंद्र जोशी महाराज विराजमान झाले. अन्य वाहनात वेशभूषेतील देवदेवता होत्या. पुढे घोडे आणि ढोल ताशांचा गजर… पाठीमागे लांबवर डोक्यावर कलश घेवून हजारो महिला आणि ध्वनक्षेपकावरून मोठ्या आवाजात सुरू असणारे धार्मिक संगीत अशा मंगलमय वातावरणात कलश यात्रेला सुरुवात झाली. लालभडक रंगाची साडी परिधान करत डोक्यावर कलश आणि मुखातून अखंड मंत्रोच्चार करत असणाऱ्या हजारो महिलांची कलश यात्रा प्रमुख मार्गावरून नदीवेस मार्गाकडे निघाली. जागोजागी नागरिकांनी यात्रेवर फुलांचा वर्षाव करत स्वागत केले.
यात्रेतील सहभागी भक्तगणांसाठी सरबताची सोय करण्यात आली होती. राज्यभरातून अनेक संत महंतही भगवी वस्त्रे परिधान करून या यात्रेत सहभागी झाले होते. कोणी हनुमानाच्या रूपात हातात गदा घेऊन तर कोणी हातात टाळ चिपळ्या घेऊन मनमुराद नाचत होते. मार्गावर विलक्षण कलश यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. श्री पंचगंगा वरात विनायक मंदिर परिसरात कलश यात्रेचा समारोप झाला. यात्रा मार्गावर स्वयंसेवकांनी स्वच्छतेबाबत खास दक्षता घेतली. या यात्रेत अशोकराव स्वामी, बाळासाहेब जांभळे ,द्वारकादास सारडा, गोविंद बजाज,रामदेव राठी, मिश्रीलाल बजाज, हेमाराम प्रजापत, गोविंद सोनी, श्याम काबरा, हनमंत वाळवेकर, शिवबसू खोत, विनायक रेडेकर, पंडित शितल पाटील ,काजवे, प्रशांत चाळके, बाळकृष्ण मिठारी, राजू तळंदगे, सुधीर जाधव, मोहन नाजरे, गजानन स्वामी, गजानन पाटील, दिलीप मुथा ,सुनील तोडकर, विश्वनाथ मेटे, विनायक मुरदुंडे , अरुण बंडगर,राहूल जानवेकर नागेंद्र पाटील उमाकांत दाभोळेश्री सनातन ज्ञान प्रसार समिती,श्री. पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ, गायत्री सेवा मंडळ, जय जगदंबा सत्संग मंडळ, त्यागी भवन, मारुती सत्संग मंडळ,माय फौंडेशन, केसरवानी ग्रुपचे सदस्य व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.