मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मुंबईच्या परेल येथील दामोदर नाट्यगृह हे सहकारी मनोरंजन मंडळ कलावंतांचे प्राण आणि रसिकांचे ह्रदय असून पुनर्बांधणीचे थांबलेले काम त्वरित सुरू झाले पाहिजे,असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी येथे कलाकारांशी बोलताना केले.
सोशल सर्व्हिस लिगने पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्या नंतर शंभर वर्षाची परंपरा असलेले दामोदर नाट्यगृह, सहकारी मनोरंजन मंडळ, शाळा आदी सार्वजनिक उपक्रमा बाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यावर नुकत्याच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत सर्वश्री आमदार सचिन अहिर, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आदी सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तर विधानसभेत शिवसेना (ऊध्दव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ गटनेते आमदार अजय चौधरी, आदींनी प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणली होती.
सभागृहाबाहेर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही कलाकारांशी संवाद साधला होता. या एकूण पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी रंगकर्मीची भेट घेतली. लवकरच न्यासाच्या सदस्यांची भेट घेऊन, त्यांची बाजू समजून घेण्यात येईल. याप्रसंगी सर्वश्री मंडळाचे अध्यक्ष प्रमोद तांबे, कार्यकारिणी सदस्य रविराज नर आदींनी कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती दिली. त्यावेळी निवृत्ती देसाई, शिवाजी काळे, काशिनाथ माटल आदी कामगार नेते उपस्थित होते.