*दिशा फाउंडेशन तर्फे सौ. शितल शेळके, आंबेगाव यांना आर्थिक मदतीचा हात…*
सावंतवाडी
आंबेगाव, सटवाडी, तालुका सावंतवाडी येथील सौ. शीतल विठ्ठल शेळके वय वर्ष 36 या गेल्या सहा महिन्यापासून गर्भपिशवीच्या कॅन्सरच्या आजाराने त्रस्त आहे. आत्तापर्यंत त्यांच्यावर लहान शस्त्रक्रिया झालेले आहेत. सौ. शेळके यांच्या पुढील दोन शस्त्रक्रियेसाठी सुमारे पाच लाख रुपयांची गरज आहे सौ. शितल शेळके आणि त्यांचे पती मोलमजुरी करून घर खर्च भागवतात. त्यांना इयत्ता तिसरी व चौथी शिकणारी अशी दोन मुलं आहेत. त्यांच्याकडे जमीन अथवा शेती सारख्या इतर उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा परिस्थितीत त्यांना सहा महिन्यापूर्वी गर्भपिशवीचा कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील उपचारासाठी शेळके कुटुंबीयांनी कोल्हापूर तसेच गोवा येथे चौकशी केली असता शस्त्रक्रियेसाठी पाच लाख खर्च येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. आणि सदरची शस्त्रक्रिया तात्काळ करावी अन्यथा तो आजार वाढू शकतो असे डॉक्टरांकडून त्यांना सांगण्यात आलेले आहे.
शेळके कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी लागणारा पाच लाखांचा खर्च त्यांना करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी समाजातील दानशूर व्यक्ती अथवा संस्थांना मदत करण्याचे आवाहन सोशल मिडीया तसचे वृत्त् पत्रातून करण्यात आलेले होते. वरील सर्व परिस्थितीची माहिती वृत्त्पत्राद्वारे कळताच कलंबिस्त् हायस्कूल येथील 1993 – 1994 इयत्ता 10वी ची बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या दिशा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे सौ. शितल शेळके यांना काहीतरी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सौ. शितल शेळके यांना आपल्या दिशा फाउडेशनच्या वतीने तातडीची मदत दिल्यास त्यांना नवसंजीवनी मिळू शकते व तिच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुलवण्यास आपली मदत होऊ शकते तसेच तिच्या दोन्ही चिमुरडया मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा उमलण्यास मदत होऊ शकते. या उद्दात्त् हेतूने 10,000/- (दहा हजार ) रुपयांचा धनादेश नुकताच बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुपूर्त करण्यात आला. यावेळी दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश सावंत, सेक्रेटरी दीपक राऊळ, सह सेक्रेटरी सुषमा सावंत, खजिनदार प्रवीण कुडतरकर, सदस्य कल्पना सावंत आदी उपस्थित होते.