You are currently viewing मन करा रे प्रसन्न

मन करा रे प्रसन्न

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

*मन करा रे प्रसन्न*

एखादा फुललेला बगीचा पाहून माणसाचे मन प्रसन्न होते. हिरव्यागार शेतातील डोलणारी धान्याची कणसे पाहून मन प्रसन्न होते. पावसाच्या पहिल्या सरीत भिजताना मनाला प्रसन्नता वाटते. प्रभातीचे कोवळे किरण अंगावर घेताना मन प्रसन्न होते. क्षितिजा वरील सूर्याचेॅ तांबडे केशरी रंग पाहताना मन आनंदाने नाचते. दुडू दुडू धावणारे बालक पाहून घरात हसरे तारे उतरल्याचा भास होऊन मन प्रसन्न होते. सप्तसुरानी भारवलेली मैफल ऐकून मनात आनंद तरंग उठतात. अशी अनेक कारणे आहेत की ज्यामुळे आपले मन प्रसन्न राहून जीवनात चैतन्य येते, आयुष्य त्या क्षणी आनंददायी वाटते.
प्रश्न असा आहे की हा आनंद, मनाची ही प्रसन्न अवस्था कायम टिकणारी आहे का? याचे उत्तर अर्थातच नाही असेच मिळते. कारण या सर्व गोष्टी दृश्य विश्वातील आहेत, बदलणाऱ्या आहेत.
दुसऱ्याच क्षणी जरासे काही मनाविरुद्ध घडले की आपण निराश होतो, आपला उत्साह बारगळतो, आपण उद्विग्न होतो.
अशावेळी आठवण येते ती श्री समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या मनाच्या श्लोकातून
दिलेल्या उपदेशाची.
अध्यात्माचे अभ्यासक श्री के.व्ही. बेलसरे एके ठिकाणी लिहितात ” मी देह आहे या भावनेपासून आरंभ करून मी देव आहे या दिव्य भावनेत स्थिर होण्याची क्रिया म्हणजे माणसाच्या अंतरंगातील एक प्रवासच आहे. त्या प्रवासामध्ये जसजशी वाटचाल होते तसतसे माणसाचे मन साफ बदलू लागते. ”
रामदास स्वामी सांगतात या प्रवासात
” मना सज्जना भक्ती पंथेची जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे”
भक्ती मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला हळूहळू देह बुद्धीचा विसर पडतो आणि आत्मबुद्धी जागृत होऊन मनाची उन्मनी अवस्था होते, तीच खरी मनाची प्रसन्नता. तिचा कधीच क्षय होणार नाही.
आपल्या अनेक धर्मग्रंथात हीच शिकवण दिलेली आहे. सच्चिदानंद स्वरूप ईश्वर, हिरण्य गर्भ अथवा विश्व मन, आणि आपल्याला दिसणारे विश्व हे सर्व मिळून संपूर्ण विश्व बनले आहे आणि आनंद रूप आत्मा, मन आणि शरीर मिळून माणूस बनला आहे. परमात्मा ज्याप्रमाणे सच्चिदानंद रूपाने विश्वाच्या अंतर्यामी वास करून आहे तद्वत तो आत्मरुपाने माणसाच्या अंतर्यामी, त्याच्या हृदयात वसती करून राहिला आहे. परिस्थिती अशी आहे की माणसाचे मन आत्मस्वरूपास पूर्णपणे विसरते आणि जे नश्वर आहे, त्याच्या प्रेमात पडून क्षणिक प्रसन्नता अनुभवते आणि अखेर दुःखी होते.
याच कारणासाठी स्वानंदाचा अनुभव घेण्यासाठी मनाचा शोध घेणे जरुरी आहे. मनाला स्वानंद भोगण्यास पात्र करावे लागते. श्री समर्थांनी त्यांच्या मनाच्या श्लोकातून मानवी मनाला हाच उपदेश केला आहे.
देह बुद्धीमुळे माणूस स्वानंद हरवून बसला आहे. देह बुद्धीची आत्मबुद्धी करणे आवश्यक आहे. दृश्य, विकारी, विनाशी वस्तूंमध्ये आनंद शोधण्यापेक्षा मनाने भगवंतापाशी तो शोधावा. तो शोधण्याचे विविध मार्ग रामदास स्वामींनी त्यांच्या मनाच्या श्लोकात माणसाला उलगडून दाखवले आहेत. जसे ते लिहितात,
” जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे.
सदाचार हा थोर सांडू नये तो
जनी तोचि तो मानवी धन्य होतो
मना वासना दुष्ट कामा नये रे
मना सर्वथा पाप बुद्धी नको रे
मना कल्पना ते नको वीषयांची
विकारे घडे हो जनी सर्वचीची
नको रे सदा सर्वदा अंगीकारू
नको रे मना मत्सरे दंभ भारू
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे
मना ंजबोलणे नीच सोसीत जावे.
मना सर्वथा सत्य सांडू नको रे
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे”

अशाप्रकारे अत्यंत सोप्या भाषेत आपल्यासारख्या सर्वसामान्यांना उपदेश करून मन कशाप्रकारे अखंडितपणे प्रसन्न ठेवता येईल हे समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे. या एकूण दोनशे पाच श्लोकांनुसार माणसाने त्याच्या वागण्यात जर बदल केला तर त्याची देहबुद्धी आपोआप गळून पडेल आणि त्याला परमात्म्याची प्राप्ती झाल्याने स्वानंदाचा दिव्यानुभव मिळून खऱ्या अर्थाने त्याचे मन प्रसन्न राहील.

*अरुणा मुल्हेरकर*
*मिशिगन*

प्रतिक्रिया व्यक्त करा