वेंगुर्ला :
वेतोरे येथे राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने श्री देवी सातेरी हायस्कुल व कै. सौ. गुलाबताई नाईक कनिष्ठ महाविद्यालयात भव्य गणित जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री.संतोष गोसावी, शिक्षण प्रसारक समिती उपकार्याध्यक्ष श्री. सूर्याजी नाईक, कार्यवाह श्री. प्रभाकर नाईक सर, श्री.चंद्रकांत गडेकर, श्री.शिवराम गोगटे, मुख्याध्यापक श्री.संजय परब सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या गणित जत्रेचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी श्री संतोष गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेतील प्रा. श्री.चैतन्य सुकी, सौ.सुजाता नाईक, सौ.ओवी पवार, श्री. रविकांत कदम सर या गणित शिक्षकांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या गणित जत्रेत सुमारे सव्वाशे गणितीय खेळ, ऍक्टिव्हिटी, कोडी व शैक्षणिक प्रतिकृती इत्यादींचा समावेश आहे.
उदघाटन प्रसंगी श्री गोसावी सर यांनी वेतोरे हायस्कुलच्या शिस्तप्रिय विद्यार्थ्यांचं कौतुक केलं व आयुष्याचं गणित सोडवताना शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा मौलिक संदेश देखील त्यांनी या प्रसंगी दिला. वेतोरे हायस्कूल येथे जेवढे उपक्रम राबविले जातात तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात यावेत. प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व यांनी एकदिलाने अल्पावधीतच या शैक्षणिक जत्रेची निर्मिती केली. याबद्दल सर्वांचे कौतुक केले. संस्थेचे कार्यवाह श्री नाईक सर यांनी गणिताचे महत्व पटवून देत बुद्धिमत्ता वाढली तर व्यक्तिमत्व चांगले होते असा संदेश दिला.
मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्री परब सर यांनी केलं, प्रास्तविक श्री चैतन्य सुकी सर, सूत्रसंचालन श्री.निलेश पेडणेकर सर तर आभार सौ.दिप्ती प्रभू मॅडमनी मानले. सर्व गणित प्रेमींनी या गणित जत्रेला भेट द्यावी असे आयोजकांनी आवाहन केले आहे.