वैभववाडी :
खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीचा जत्रोत्सव २२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या जत्रोत्सवाची तयारी पुर्ण झाली आहे. या जत्रोत्सवाच्या निमित्ताने राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन लय, ताल, सुरांचा सुदंर मिलाफ रसिकांना अनुभवता येणार आहे.
खांबाळे गावचे ग्रामदैवत श्री देवी आदिष्टीचा सप्ताह तथा जत्रोत्सव २२ डिसेंबरला होत आहे. या जत्रोत्सवाची तयारी गेल्या काही दिवसांपासुन सुरू आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने आणि फुलांनी सजविण्यात आले आहे. स्टॉलधारकासाठी खास सोय करण्यात आली आहे, पार्किंगची देखील चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
या जत्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हयातील नामाकिंत १३ भजनी मंडळांना स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे. यामध्ये श्री.काशी कलेश्वर भजन मंडळ कलमठ, महापुरूष प्रासादीक भजन मंडळ पिंगुळी, लिंगेश्वर भजन मंडळ असरोंडी मालवण, रवळनाथ भजन मंडळ जानवली, गजानन भजन मंडळ देवरूख रत्नागिरी, देव रवळनाथ भजन मंडळ पिंगुळी, मोरेश्वर भजन मंडळ नेरूर, नटराज भजन मंडळ पिंगुळी, सदगूरू भजन मंडळ कुडाळ, सिध्दीविनायक भजन मंडळ जानवली, गांगेश्वर भजन मंडळ हरकुळ, बालमित्र भजन मंडळ फोंडा, आणि रवळनाथ भजन मंडळ पावणादेवी या भजनी मंडळाचा समावेश आहे.
या सप्ताहाचा प्रारंभ सकाळी ९ वाजता होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते ३ या कालावधीत स्थानिक भजने होणार आहेत. तर रात्री १०.३० ते ११.१५ या कालावधीत पालखी सोहळा होणार आहे.
राज्यस्तरीय भजन स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी १५ हजार व चषक, द्वितीय १० हजार ५५५ रूपये व चषक, तृतीय ७ हजार ५५५ व चषक, चतुर्थ ५ हजार ५५५ रूपये चषक तर पाचव्या क्रमांकासाठी ४ हजार ४४४ व चषक अशी बक्षिसे आहेत. याशिवाय उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट तबलावादक, उत्कष्ट पखवाज वादक, उत्कृष्ट कोरस, उत्कष्ट झांजवादक यांना प्रत्येक १ हजार ५५५ रूपये व चषक देण्यात येणार आहे.
या जत्रोत्सव आणि भजन स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री.देवी आदिष्टी देवस्थान स्थानिक सल्लागार व्यवस्थापन समिती खांबाळेच्यावतीने करण्यात आले आहे.