*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सदाफुली*
मना मोहवी सदाफुली
रंगाने फिकट जांभळ्या
फेर धरती बिलगून
फुलाच्या पाच पाकळ्या ….
रंग शोभिवंत जरा गडद
पाकळी-पाकळी भेटता
वाटे लावियला टीळा
मिलनाचा आनंद वेचता ….
फुलाचा दांडा नाजुकसा
पेलण्या पाकळ्यांचा भार
अग्रभागी होतो फुगीर
देत अमोलसा प्रेमाधार ….
प्रेमाचाच रंग गुलाबी
चढे पाकळीच्या पाठी
जणू दाखवी कृतज्ञता
स्नेहबंधाच्या पक्या गाठी ….
शुभ्र पांढरा संगी साथी
मान्य रंगात विविधता
अनुरुप टीळा साजेसा
वाढे बागेची सुंदरता ….
विजया केळकर_______
नागपूर