कार्यालयात जीन्स, टी-शर्ट, स्लीपरचा वापर न करण्याच्या सूचना
कणकवली :
शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज करणारे बरेच अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्याला अनुरुप ठरेल, अशा वेशभूषेचा वापर करत नाहीत. परिणामी शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होत असल्याने शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ‘ड्रेसकोड’ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार दैनंदिन पेहराव हा कर्मचाऱ्यास शोभनीय असावा. अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स व टी-शर्टचा वापर कार्यालयात करू नये. तसेच कार्यालयात स्लीपरचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
सर्व कार्यालये ही राज्य शासनाचे जनमानसातील प्रतिनिधी म्हणून पाहण्यात येतात. या कार्यालयांमध्ये राज्यभरातील खासदार, आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक, अन्य खासगी संस्थांचे, आस्थापनांचे प्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकारी कामासाठी भेट देत असतात. अशावेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासकीय कार्यालयातील सर्व प्रकारचे अधिकारी /कर्मचारी यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. त्यांच्या वेशभूषेवरून ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची एक विशिष्ट छाप भेट देणारया अभ्यागतांवर पडते.
मात्र, कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे अधिकारी / कर्मचारी, प्रामुख्याने कंत्राटी तत्वावरील नियुक्त कर्मचारी, सल्लागार हे कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्याला अनुरुप अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तिमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. अशा परिस्थितीत वेशभूषा अशोभनीय, गबाळे तसेच अस्वच्छ असेल, तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत कामकाजावरही होतो. त्यामुळे पेहरावाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
त्यानुसार सर्व अधिकारी, कर्मचारयांचा दैनंदिन पेहराव हा शासकीय कर्मचाऱ्याला शोभनीय असावा. पेहराव व्यवस्थित असावा. यात महिला कर्मचारयांनी कार्यालयात साडी, सलवार / चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम, चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्ट याचा वापर कार्यालयामध्ये करू नये. यापूर्वीच्या सूचनेनुसार सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आठवड्यात एकदा (शुक्रवारी) खादी पेहराव करावा. परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा, याची दक्षता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी. कार्यालयीन वेळेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विहीत नमुन्यातील कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करावे. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात शक्यतो चपला, सँडल, बूट (शूज) याचा वापर करावा. पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सँडल याचा वापर करावा. कार्यालयात स्लीपरचा वापर करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.