*पेट्रोलिंग संशोधनाचा विषय*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सव सुरू झाले आणि जुगारांची मैफिल सजू लागली.गावागावात सुरू होणाऱ्या जत्रोत्सवांमध्ये जुगाराचे अवैद्य धंदे जोरदार सुरू होतात. गावपातळीवर जत्रोत्सवापासून आजूबाजूच्या नारळ-पोकळींच्या बागांमध्ये, दाट वनराईच्या ठिकाणी जुगाराचे नियोजन केले जाते. असेच जुगाराचे नियोजन जत्रोत्सवात होत असल्याचे सूत्रांकडून खात्रीलायक वृत्त आहे.
रात्री उशीरा स्थानिक खाकी वर्दीच्या वरदहस्ताखाली खुलेआम जुगार सुरू होतात असे खात्रीशीर वृत्त हाती आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्ष जुगार बंदी आणली गेली असून जुगार बंद झाल्यामुळे जत्रोत्सव हे भाविकांचे भक्तीचे ठिकाण म्हणून नावारूपास आले. परंतु जत्रोत्सवात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन जिल्ह्यातील मोठमोठे जुगारी जत्रोत्सवात जुगार भरवून गावातील गोरगरीबांच्या पैशांवर डल्ला मारतात. त्यामुळे मोलमजुरी करून जमवलेला पैसा एका रात्रीत लुटला जातो. काही लोक घरातील दागिने गहाण ठेवून देखील जुगारावर पैसे लावतात अन् बरबाद होतात. त्यामुळे खेळणारे भिकारी अन् तक्षिमदार मालामाल होतात.
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यात सुरू झालेल्या जत्रोत्सवातील जुगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी अनेक गावातील लोकांकडून होत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.