You are currently viewing ‘माझ्यातली मी’

‘माझ्यातली मी’

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालीत्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्माननीय सदस्य कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

कवी वैभव जोशी यांच्या पुढील चार काव्यपंक्तींना आपल्या शब्दांत पुढे नेण्याचा…‘माझ्यातली मी’ या फेसबुक समूहावर…उत्कृष्ट ठरलेला प्रयत्न
—————————————
एक इरादा हसण्याचा अन् विरोधात दुनिया सारी
आणि नभाशी कशा न्यायच्या इतक्या छोट्या तक्रारी
आज निसरड्या संध्येवरूनी पाय घसरला कोणाचा
आज कुणाचा उजेड गेला अंधाराच्या आहारी?

कवी वैभव जोशी
—————————————-

*विरोधाभास*

धरतीची करूनी शय्या, निळे आकाश पांघरणारी
दगडगोटे जरी खेळण्या, विनातक्रार खेळणारी
मऊ मुलायम शय्येवरती, का अप्रसन्न निद्रादेवी
आज कुणाचा उजेड गेला, अंधाराच्या आहारी?

भाकरीच्या चंद्रासाठी, रात्रंदिवस राबणारी
चतकोर हिस्सा देऊन भुकेल्या, ढेकर तृप्तीचा देणारी
पक्वान्नाचे ताट सारुनी, का नशिबी औषध गोळ्यांवर जगणं
आज कुणाचा उजेड गेला, अंधाराच्या आहारी?

आईच्या कुशीस वंचित, अर्भकं अभागी तडफडणारी
मातृहृदयी कुणी भेटते तयांना, ऊब मायेची देणारी
कुणी करंटे मातापित्यांना, वृद्धाश्रमी का पाठवती
आज कुणाचा उजेड गेला, अंधाराच्या आहारी?

@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
२६-११-२३

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत आपल्याला कविता आवडल्यास लाईक करून शेअर नक्की करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा