दिल्लीच्या कला साक्षी मेमोरियल ट्रस्टचा आर्ट पुरस्कार व स्कॉलरशिप
ओटवणे :
नवी दिल्ली येथील कला साक्षी मेमोरियल ट्रस्टच्या मेटरिंग कार्यशाळा आणि प्रदर्शनसाठी ओटवणे गावचा युवा आर्टिस्ट रोहित सुरेश वरेकर याची निवड झाली असुन या प्रदर्शनाच्या समारोप सोहळ्यात रोहित वरेकर याला या ट्रस्टच्या आर्ट स्कॉलरशिपच्या रोख पारितोषिकासह आर्ट पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
रोहित वरेकर याची पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठ शांतिनिकेतनचा विद्यार्थी म्हणून या स्कॉलरशिपसाठी निवड झाली आहे. नवी दिल्ली येथील कला साक्षी मेमोरियल ट्रस्ट दरवर्षी युवा आर्टिस्ट यांना आर्ट स्कॉलरशिप प्रदान करते. ट्रस्टच्या आर्ट स्कॉलरशिपसाठी यावर्षी देशभरातील विविध कला विद्यापीठामधून ३०० युवा आर्टिस्ट यांच्या प्रवेशिका आल्या होत्या. ट्रस्टच्या निवड सदस्यांनी यातील २२ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यानंतर या विद्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखत घेऊन एकूण १२ विद्यार्थ्यांची ट्रस्टच्या या स्कॉलरशिपसाठी निवड करण्यात आली.
दिल्लीच्या एमजी रोड येथील संस्कृती केंद्रात या ट्रस्टची वार्षिक मेटरिंग कार्यशाळा व प्रदर्शन घेण्यात आले. या संस्कृती केंद्रात झालेल्या कार्यशाळेत रोहित वरेकर यांच्यासह सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या कला क्षेत्रातील कलाकृतीचे प्रदर्शन मांडले होते. त्यानंतर झालेल्या स्कॉलरशिप प्रदान सोहळ्याला संस्थेच्या विश्वस्त कविता नायर, प्रसिद्ध कला मार्गदर्शक सुषमा बाही, नवी दिल्ली येथील इस्लामिक युनिव्हर्सिटीचे गजनफर जैदी, प्रा जामिया मिल्लीया आदी मान्यवर उपस्थित होते.