छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारा कार्यक्रम पर्यटन व्यावसायिकांच्या माध्यमातून सुरु करणार – बाबा मोंडकर
मालवण :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर किल्ले राजकोट व पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्था पर्यटन व्यावसायिकानी किल्ले राजकोट येथे भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
याठिकाणी गेल्या चार दिवसात हजारो पर्यटकांनी भेट दिली. पर्यटनासाठी एक नवा राजमार्ग निर्माण झाला आहे. इथल्या स्थानिक नागरिकांसाठी रोजगार निर्माण व्हावा यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच शिवकालीन कल्चर काय हे पर्यटकांना समजण्यासाठी व अनुभवता यावे यासाठी सिंधुरत्न कलामंचच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारा कार्यक्रम पर्यटन व्यावसायिकांच्या माध्यमातून सुरु करणार असल्याचे पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले