*सिकचीयन्स फाउंडेशनची स्थापना करून सिकची हॉस्टेलचे भूमिपूजन*
*सिकची परिवार आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पुन्हा उभे राहतेय “सिकची हॉस्टेल”…*
आज भारतातील प्रत्येक शहराची वाटचाल प्रगतीकडे सुरू आहे. अमरावतीही त्याला अपवाद नाही. पण शंभर दिडशे वर्षांपूर्वीची अमरावती आठवा. दळणवळणाची फारशी साधने नाहीत ,मुक्कामाची सोय नाही .अशा परिस्थितीत अमरावतीच्या सिकची परिवाराने पुढाकार घेऊन साबनपुरा भागात एका धर्मशाळेची निर्मिती केली. हा साबणपुरा हा भाग तत्कालीन एसटी स्टँडला म्हणजे गांधी चौकाला लागून असलेला भाग. अमरावतीच्या गांधी चौक हा भाग म्हणजे येथून एसटी बसेस सुटायच्या. एसटी सुरू होण्याच्या आधीही इथे खाजगी हाफटन गाड्या सुटायच्या., शेवटची गाडी निघून गेली आणि ज्यांची ती हुकली त्या लोकांना आपल्या नातेवाईंकाकडे मुक्काम करावा लागत होता .ज्यांचे नातेवाईक नव्हते त्यांना सोयीचे व्हावे म्हणून सिकची धर्मशाळा व बजाज धर्मशाळा तसेच छत्रपती खिडकी वलगाव रोड या धर्मशाळांची निर्मिती झाली. सिकची परिवाराने धर्मशाळा संस्थान असे त्याचे नामकरण केले. सिकची धर्मशाळेचे वैशिष्ट्य हे होते की तेथे अन्नछत्र चालायचे .या परिवारातील दानशूर श्रीमती रामप्यारीबाई स्वतः धर्मशाळेत येऊन पुरणपोळ्या तयार करून गरजवंतांना वितरित करायच्या.गरीब होतकरू व गरजवंताना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. पुढे हाच वारसा सिकची परिवाराने चालविला आणि आजही तो कायम आहे .श्रीमती रामप्यारीबाईनंतर त्यांच्या नावाने श्रीमती रामप्यारीबाई मानकलाल सिकची ट्रस्ट तयार झाला. पुढे १९५३ सालीअमरावतीला येणाऱ्या गरीब होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी सिकची होस्टेलची निर्मिती झाली .त्या हॉस्टेलचे पहिले विद्यार्थी श्री नंदापुरे गुरुजी आजही यवतमाळ जिल्ह्यातील लोणी येथे राहतात. त्यांचे वय आता 90 च्या जवळपास आहे .पण प्रकृती ठणठणीत आहे .सिकची परिवारातील श्री किशोर सिकची विमलकुमार सिकची सुरेश कुमारजी राजेश कुमारजी सिकची मीनाक्षीताई सिकची अनुरागजी सिकची या सर्वांनी आपल्या परिवाराचा आदर्श डोळ्यासमोर कायम ठेवला .काळ बदलत गेला .अमरावती शहरात अजून काही वस्तीगृहे तयार झाली .शासकीय योजना आल्या. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे तयार करण्यात आलीत. पण सिकची होस्टेलच्या बाबतीत असे म्हणावे लागेल त्याच्यासारखे तेच .कारण या वस्तीगृहाने अनेकांना जीवदान दिले. गरीब होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना जे अमरावतीला येऊन शिकत होते व ज्यांची राहण्याची जेवणाची सोय नव्हती .त्यांना या वस्तीगृहाने फक्त दहा रुपयात इतक्या नाममात्र शुल्कात राहण्याची जेवणाची निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था करून दिली. केवळ दहा रुपयांमध्ये राहण्याची जेवणाची व्यवस्था करणारे अशा प्रकारचे हे वस्तीगृह कालांतराने शिकस्त होत गेले. आणि जीर्ण झालेली इमारत धोक्याची झाली .अशा वेळेस नाईलाजाने वस्तीगृह बंद करावे लागले. या वस्तीगृहामध्ये राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे यजमान श्री देवीसिंह शेखावत आजचे राजकीय नेते श्री शंकरराव हिंगासपुरे प्राचार्य देवकिसन बाहेती ग्रंथपाल सत्यनारायण बाहेती पत्रकार न मा जोशी श्रीपाद कॉन्टिनेन्टलचे मालक श्री बोरखडे अशी कितीतरी नाव चर्चेत आहेत ती सांगता येतील. हे वसतिगृह जेव्हा बंद झाले तेव्हा माजी विद्यार्थ्यांना खूप दुःख झाले .कारण की ते एक माहेर होते .श्रीमती रामप्यारी बाईंनी एक वारसा या सिकची परिवाराला देऊन ठेवला होता. सिकची हॉस्टेल बंद झाल्यानंतर माजी विद्यार्थी एकत्र येत होते .चर्चा करीत होते .काय करायचे ते ठरत नव्हते .एक दिवस माजी विद्यार्थी श्री बाबाराव वानखडे व चंद्रकांत धुरजळ होस्टेलच्या सध्याच्या धुरा सांभाळणाऱ्या मीनाक्षीताई सिकचीकडे गेल्या. आपला आपला परिचय करून दिला. आपल्या पूर्वजांच्या वस्तीगृहात शिकलेली व मोठी झालेली मुले आपल्या भेटीसाठी आलेली पाहून मीनाक्षीताईचे सासरे श्री विमलकिशोरजी सिकची यांना गहिवरून आले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. मीनाक्षीताई अमरावती शहरातील बियाणी चौकात दोटीवाला परिसरात राहतात. त्यांच्या निवासस्थानी झालेली ही भेट सिकची परिवाराला सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देऊन गेली. वस्तीगृह बंद झाले .पण अजूनही समाजामध्ये गरीब अनाथ मुले आहेतच. हाच धागा पकडून सर्व माजी विद्यार्थी श्री बाबाराव वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीच्या मोर्शी रोडवरील जिजाऊ लाँनमध्ये एकत्र आले आणि त्यातून निर्मिती झाली ती सिकचीयन्स फाउंडेशन या संस्थेची. आपण गरिबीत शिकलो .मोठे झालो. मोठ्या पदावर लागलो. आता जबाबदारी आहे येणाऱ्या पिढीला मदतीचा हात देण्याची .ही गोष्ट त्यांनी मीनाक्षीताईला सांगितली.मीनाक्षीताई आणि विमलकिशोरजींना खूप आनंद झाला आणि त्यांनी सांगितले तुम्ही एकत्र आलात. चांगली गोष्ट आहे .आम्ही आमच्या पूर्वजांच्या वारसा पुढे चालविणार आहोत आणि कोणत्याही प्रकारची मागणी नसताना त्यांनी या नवीन पिढीच्या विचारासाठी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांना सुमारे दोन एकर जागा हवाली केली .जागाही अशी तशी नाही .पोटे टाऊनशिपला लागून असलेल्या तोमाई हायस्कूलजवळची करोडो रुपयाचा भाव असलेली जागा सिकची परिवाराने सिकचियन्स फाउंडेशनला या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेला दान केली. एवढेच नाही तर या जागेवर परत सिकची होस्टेल फिनिक्स पक्षासारखे उभे राहण्यासाठी त्यांनी फार मोठा आर्थिक निधी देण्याचे संकल्प देखील सोडला. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये सोळा खोल्या बांधण्यात येणार असून परवा त्याचे रितसर भूमिपूजन सिकची परिवार व माजी विद्यार्थी यांच्या भरगच्च उपस्थितीत प्रत्यक्ष कार्यस्थळावर संपन्न झाले.सिकची परिवाराचा हा आदर्श खरोखरच डोळ्यासमोर ठेवण्यासारखा आहे. आज जेव्हा भावा-भावात नातेवाईकांमध्ये स्नेहभाव दुरावत चाललेला आहे. तेथे या परिवाराने अमरावती शहरातील विद्यार्थ्यांसाठी नव्याने होस्टेल तयार करावे व त्यासाठी जागा पैसा व स्वतःचा वेळ देखील द्यावा. हे खरोखरच चांगले आहे. परवा भूमिपूजन झाले तेव्हा सिकची परिवारातील सर्व परदेशातील देशातील सदस्य व सुप्रसिद्ध पत्रकार श्री नानक आहुजा तसेच मंगल वस्त्रालयाचे श्री प्रशांत मुंदडा आवर्जून या भूमिपूजनाला उपस्थित राहिले. या विस्तीर्ण जागेमध्ये गरीब होतकरू अभ्यासू मुलांसाठी त्यांनी उचललेले हे पाहून खरोखरच अमरावतीकरांसाठी आदर्शमय व भूषणावह आहे. आज येथे धु-यावरून शेतीच्या तासावरून जागेसाठी भांडणे होतात .त्या आधुनिक कलियुगात सिकची परिवाराने जवळपास दोन एकर शेतीचे तसेच होणाऱ्या वास्तूसाठी प्रचंड मोठे आर्थिक योगदान देऊन जे औदार्य दाखविले ते निश्चितच भूषणावह आहे .मला खात्री आहे या जागेचा या वास्तूचा अमरावतीच्या नवीन पिढीसाठी निश्चितच उपयोग होणार आहे. आज या सिकचियन्स फाउंडेशनमध्ये काम करणारे श्री मनोहर वासनकर बाबाराव वानखडे ज्ञानेश्वर कुर्वे दिनकर इंगोले प्रकाश खरडकर गिरीधर चव्हाण अनिल मोहोड जुगलकिशोर भुतडा हे सारे कामाला लागलेले आहेत. काही माजी विद्यार्थ्यांनी लाख लाख रुपयांच्या देणग्या गेट-टु- गेदर कार्यक्रमात प्रत्यक्ष आणून दिलेल्या आहेत .हा ओघ असा सुरू राहणार आहे. साथी हात बढाना एक अकेला थक जायेगा मिलकर बोज उठाना या नायाने सिकचीयन्स फाउंडेशन काम करीत आहे, करीत राहणार आहे .या निमित्ताने सिकची परिवाराने जो अनमोल भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे तसेच जमीनदान व निधी दान केलेले आहे ते शब्दातीत आहे .या परिवाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अमरावती शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे व अमरावतीच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विभागासाठी जमेल तेवढा हातभार लावला तर अमरावती शहरातील गरीब होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचे जीवनपट बदलल्याशिवाय राहणार नाहीत. प्रा.डाँ.नरेशचन्द्र काठोळे.संचालक .मिशन आय.ए.एस,अमरावती9890967003