You are currently viewing सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचलन प्रशिक्षण कार्यक्रम

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचलन प्रशिक्षण कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी

मत्स्य व्यवसाय विभागामार्फत सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचलन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण हे सहा महिन्यांच्या कालावधीचे असून 1 जानेवारी 2021 पासून हे प्रशिक्षण सुरू होणार आहे. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे हे प्रशिक्षण वर्ग होणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

            सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठीचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी हा 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 असा आहे, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्ष असावे, शिक्षण किमान चौथी पास असावे, क्रियाशील मच्छिमार व किमान 1 वर्षाचा मासेमारीचा अनुभव असावा, उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे. उमेदवाराने अर्जासोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला व विहीत नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस जोडावी. प्रशिक्षणाचे शुल्क एकूण 2 हजार 700 रुपये आहे. दारिद्र्य रेषेखालील असल्यास सहा महिन्याचे शुल्क सहाशे रुपये, त्यासाठी गटविकास अधिकारी यांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा.

            या प्रशिक्षणाचे लाभ पुढील प्रमाणे आहेत. राष्ट्रीय सहकार विकास निगम अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेऊन नौका बांधता येते. सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. अधिक माहितीसाठी रत्नाकर प्रभाकर राजम, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, मालवण, सिंधुदुर्ग, यांच्याशी 9421264438 किंवा अ.ग. बोधले, यांत्रिकी निर्देशक, मालवण – 9665143935 यांच्याशी व्हॉट्सअप किंवा फोन द्वारे संपर्क साधावा किंवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, दांडी- मालवण, मु.पो.ता. मालवण, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. जिल्ह्यातील इच्छुक युवकांनी प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधऊन विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून घ्यावेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी रत्नाकर राजम यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा