You are currently viewing गंमत पावसातली

गंमत पावसातली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर [दिपी] लिखित अप्रतिम बालकविता*

बालकविता
*वृत्त हरिभगिनी*

*गंमत पावसातली*

चला मित्रहो सारे मिळुनी गट्टी करुया पाण्याशी
थेंब थेंब हे टपोर पाणी झेलुन भिजवू अंगाशी ||धृ||

लाल पांढरे हिरवे पिवळे कपडे ओले झालेले
अंगावरती घेउन धारा पाण्यामध्ये न्हालेले
घरात येता आईचे मग थापट खाऊ गालाशी
थेंब थेंब हे टपोर पाणी झेलुन भिजवू अंगाशी ||१||

हासत नाचत रस्त्यामधुनी धावत खेळत जाताना
पायाखाली चुळबुळ करते हळूच पाणी पळताना
कितीक सांगू मज्जा येते हात मिळवुनी हाताशी
थेंब थेंब हे टपोर पाणी झेलुन भिजवू अंगाशी ||२||

एक सावली धावत होती मुलांच्या पुढे पाण्यावर
आनंदाने खिदळती मुले पावसातल्या गाण्यावर
थरथरते मग अंग मुलांचे सलगी होता वाऱ्याशी
थेंब थेंब हे टपोर पाणी झेलुन भिजवू अंगाशी ||३||

© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा