सिंधुदुर्गनगरी
जिल्हा पोलीस दलातर्फे महिला अत्याचार व बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांकरिता जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे आणि सावंतवाडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर सेल श्री. सुतार यांनी सोशल मीडियावर होणारे अत्याचार याबाबत माहिती देऊन त्यावर काय उपाययोजना करावेत याची माहिती विद्यार्थिनींना दिली. तसेच बाल लैंगिक अत्याचार व शोषण याबाबतची माहिती प्रभारी पोलीस उपअधिक्षक संध्या गावडे यांनी दिली. तर पोलीस उप निरीक्षक श्रीम. जगताप यांनी पोलीस दिदीबाबतची माहिती दिली. यावेळी जिल्हा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, मुख्याध्यापक श्री. कुसगावकर व संचालक मंडळ हे उपस्थित होते. पूर्ण जिल्ह्यातील शाळांमध्ये महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले.