‘११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.
सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन
वैभववाडी
संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने २००३ पासून दिनांक ११ डिसेंबर हा जगभरामध्ये “आंतरराष्ट्रीय पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या मध्यवर्ती संकल्पनेनुसार तो साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहकांची शिखर संघटना असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे अर्थात AMGM तर्फे गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत दिनांक ११ डिसेंबर रोजी आपल्या जवळील पर्वतावर जाऊन तिथे पर्वत पूजन करणे, किंवा या तारखेच्या जवळील सुट्टीच्या दिवशी एखादा किल्ला, डोंगर यावर चढाई करणे, त्या ठिकाणी निसर्ग जपणुकीची सामूहिक शपथ घेणे, गड परिसरात संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर सत्कार करणे अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे “पर्वतांशी निगडीत जैवविविधता” (Restoration of Mountain Eco System) या मध्यवर्ती संकल्पनेनुसार जगभरामध्ये पर्वत दिन साजरा करायचा आहे मानवाच्या आयुष्यामध्ये पर्वतांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अनेक निसर्गचक्र पर्वतांवर अवलंबून असतात. पर्वतांमधून उगम पावणाऱ्या नद्या त्यांनी पोसलेली जंगले, त्यांच्या पर्यावरणात नांदणारे वन्यपक्षी, प्राणी वनस्पतींची जीवसृष्टी, या नद्यांच्या खोऱ्यामध्ये अनादी अनंत काळापासून बहरलेली, समृद्ध झालेली मानवी संस्कृती या सर्वांना जन्मास घालणारे पर्वतच असतात. भूत, वर्तमान आणि भविष्य हे ज्यात विलीन होतात, त्या चिरंतनाचा प्रत्यय देणारे पर्वतच असतात. या पर्वतांचे महत्त्व वेदांनी सहस्त्रावही वर्षांपूर्वी जाणले आणि “उपहरे गिरिणा संगथे च नदिनां धिया विप्रो अजायेत || म्हणजेच पर्वतांच्या गुहात आणि नद्यांच्या संगतीत ध्यान करून साधक विपर ‘म्हणजे ज्ञानी होतात.”
पर्वतांशी निगडित जैवविविधता याबद्दल विविध कार्यक्रमाचे यावर्षी आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षीच्या संकल्पनेनुसार महासंघातर्फे जनजागृती करण्यासाठी एक लघुपट बनविण्यात आला असून हा लघुपट शाळा, महाविद्यालय, विविध आस्थापने व इतर ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. पर्वत हा पृथ्वीवरील अमूल्य ठेवा आहे व तो जपण्यासाठी सर्वांनी पर्वत दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजित करून हा विषय जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण, उपाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत व सचिव प्रा.एस.एन.पाटील यांनी केले आहे.