वैभववाडी
माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक या संस्थेच्यावतीने ११ डिसेंबर या “आंतरराष्ट्रीय पर्वत दिना” निमित्त पर्वत पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवासह सर्व जीवसृष्टीमधील सजीवांच्या जडणघडणीमध्ये पर्वताची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. पर्वतांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच एकुणच सृष्टीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) दिनांक ११ डिसेंबर,२००२ मध्ये ११ डिसेंबर हा “आंतरराष्ट्रीय पर्वत दिन” म्हणून जाहीर केला. तेव्हापासून हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये पर्वत/डोंगरांना अनन्यसाधारण महत्त्व असून विधिवत पूजनाची परंपरा आहे.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन कार्यक्रम साजरा करण्याबाबत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे सर्व जिल्हा संघटनांनी/ संस्थानी “आंतरराष्ट्रीय जैवविविधता पर्वत दिन” साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्यावतीने पहिला कार्यक्रम शुक्रवार दि.११ डिसेंबर रोजी निश्चित केला आहे. या दिवशी सकाळी ठिक १०.०० वा. आंबोली येथील महादेवगड पॉईंट येथे संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश नारकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहाय्यक वन संरक्षक सिंधुदुर्ग व पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन्यजीव अधिकारी मा.सुभाष पुराणिक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी या क्षेत्रातील संबंधित तज्ञ बाबल अल्मेडा, हेमंत ओगले व डाॕ.बापू भोगटे व ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे उपस्थित राहणार आहेत. तसेच यामध्ये सिंधुदुर्ग अॕडव्हेंचर टिम, आंबोली रेस्क्यू टीम, बाबल अल्मेडा टिम व शिवाप्रेमी सिंधुदुर्ग टिम सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व स्थानिक गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी तसेच निसर्गप्रेमीनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष श्री. प्रकाश नारकर, उपाध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण व सचिव प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले आहे.