अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार सामंत यांच्या हस्ते
सावंतवाडी :
राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसानिमित्त अर्चना फाऊंडेशनच्यावतीने व पुस्तक विश्वच्या सहकार्यानं भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन सावंतवाडीतील नारायण मंदिर येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं.
आज सिंधुदुर्गला वाचन संस्कृती टिकवण्याची गरज असताना अर्चना घारेंनी वाढदिवसानिमित्त घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. राजकारणापेक्षा समाजकारणात रस असणारे राजकारणी कमी दिसतात. अर्चना घारे मात्र याला अपवाद असून त्या समाजकारणाला प्राधान्य देत आहेत. त्यांच्या बोलण्यातून राजकारणातून लुप्त होत चाललेला सुसंस्कृतपणा दिसतो. वाचन हे सांगून होत नाही ते रक्तात भिनाव लागत. वाचाल तरच वाचाल अशी आज स्थिती असून नव्या पिढीने वाचनावर भर द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, साहित्यिक प्रा. गोविंद काजरेकर, साहित्यिका डॉ. शरयु आसोलकर, मालवणी कवी दादा मडकईकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकूल पार्सेकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, संदीप घारे,रेवती राणे, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, पुजा दळवी, हिदायत खान, सावली पाटकर, बावतीस फर्नांडिस आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
‘सफर पुस्तकांच्या दुनियेतील’ या उपक्रमात तब्बल आठ हजार पुस्तकांचा संग्रह या ठिकाणी असून १२ डिसेंबर पर्यंत भव्य प्रदर्शन व विक्री होणार आहे. १ ते १२ डिसेंबर पर्यंत भव्य पुस्तक प्रदर्शनाच आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत या प्रदर्शनचा लाभ घेता येणार आहे.
या भव्य पुस्तक प्रदर्शनात ८ हजार पुस्तकांच्या २३ हजार प्रती उपलब्ध आहेत. वाचन संस्कृती जपण्यासाठी, ग्रंथ संपदा वाढविण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबविला आहे. तर लहान मुलांना वैज्ञानिक खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही मुलं भविष्यात वैज्ञानिक बनावीत यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तर राजकारण करत असताना सामाजिक जाणीव जपणाऱ्यांना नेहमी आमच सहकार्य असत. अर्चना घारेंच सामाजिक काम हे कौतुकास पात्र आहे असं मत व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकूल पार्सेकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी शुभेच्छा देत असताना, शरद पवार यांची निवड चुकत नाही. सुप्रिया सुळे व शरद पवार यांनी अर्चना घारे-परब यांची केलेली निवड योग्य आहे. त्यांच सामाजिक कार्य राजकारणात प्रेरणा देणार आहे असं मत व्यक्त केलं.
तर मालवणी कवी दादा मडकईकर, साहित्यिक प्रा. गोविंद काजरेकर, ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, साहित्यिका डॉ.शरयु आसोलकर यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन पाटकर यांनी तर आभार पुंडलिक दळवी यांनी मानले.