माणगाव
आजकाल सर्रासपणे आत्महत्याच्या बातम्या आपल्या कानावर येतात. या आत्महत्यामध्ये तरूणांची संख्या लक्षणीय आहे. कोरोनामुळे लाॅकडाऊनच्या काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. त्यामुळे नैराश्येपोटी अनेकांनी आत्महत्येचा भीषण मार्ग स्वीकारला. मात्र वयाने पंचाहत्तरी ओलांडलेल्या हळदणकर आजी या संर्वासाठी प्रेरणादायी आहेत. झाराप रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आडेली रस्त्यालगत जुन्या मातीच्या घरात त्या त्या एकट्याच राहतात. मित्रासोबत या रस्त्याने जाताना या घरासमोर वाळत ठेवलेल्या कुड्याच्या पानांच्या पेंढ्यावर सहज नजर पडली. आजकाल दुर्मिळ झालेल्या पेंढ्या बघून कुतूहल जागं झाल. त्यामुळे सहज फोटो काढण्याच्या उद्देशाने गाडी रस्त्याच्या कडेला लावून पुढे गेलो. जुनं मातीच परंतु तितकीच स्वच्छ घर आणि घरासमोर रेवा (लाल माती)ने सारवलेले तुळसी वृदावन पाहून प्रसन्न वाटल. शेणाने सारवलेल्या खळ्यात कुड्याच्या पानांच्या 10-12 पेंढ्या वाळत ठेवलेल्या होत्या. कोण आलं हे पाहायला हळदणकर आजी पुढे आल्या. त्यानंतर आम्ही आजींशी या पेंढ्याबाबत विचारले. 15-20 वर्षापुर्वी या कुड्याच्या पानांच्या पेंढ्या विडी कारखानदार शेजारच्या गावातून अश्या पेंढ्या विकत घ्यायचे. या पेंढ्यात शंभरच्या जवळपास कुड्याची वाळविलेली पाने असतात. आजूबाजूच्या परिसरात आढळणारी कुड्याच्या झाडावरून हिरवी पानं काढायची, ती घरी आणून सकाळी खळ्यात पसरवायची त्यावर पाणी शिंपडायचे, त्याच सालीचे दोर काढून एकावर एक पानं ठेवून त्याचा पेंढ्या बांधायच्या. आणि रोज त्या ऊन्हात वाळवत ठेवायच्या, हळदणकर आजी आपूलकीने हे सर्व सांगत होत्या. आता मात्र काळाच्या ओघात विडी कारखाने बंद पडले.त्यामुळे लोकांनी हे काम सोडले. हळदणकर आजी मात्र आजही मागणीनुसार काही विडी शौकीनांना या पेंढ्या पुरवते.त्यातुन तिलाही चारपैसे मिळतात. पुर्वी एका पेंढ्याचे 15-20 रूपये मिळायचे आणि आता 30-35 रूपये एवढाच फरक. आजीला चार मुली, चारही मुलींची लग्न झाली. आजी मात्र स्वाभिमानी. कोणत्याही लेकीकडे रहात नाही. रस्तालगत घर असल्यामुळे आजीने छोटं दुकानही घरातच थाटलय. चाॅकलेटच्या चार-पाच बरण्या, जुन्या लाकडी कपाटात बिस्कीटचे दोन-चार पुडे, सात-आठ साबण एवढाच ऐवज. या सर्वातून मिळणाऱ्या पैशात आयुष्य जगणाऱ्या आजीच्या चेहऱ्यावरील समाधानाचे हास्य अवर्णनीय आहे. जोरदार पावसामुळे ऐन पावसाळ्यात घरामागची पडवी पडली. त्याही परिस्थितीचा सामना तिने हसत हसत केल्याचे आवर्जून सांगते. “बाबानू इलास ते चाय घेव्न जाया” ही पाहूणचाराची विचारपूस करून मनाची श्रीमंतीही दाखवली. गरिबीचे दुःख नाही आणि कष्टाची तक्रार नाही. आजच्या या नकारात्मक काळात हळदणकर आजी सर्वासाठी सकारात्मक प्रेरणा आहेत.
मित्रानु!
खूप चांगली आणि सकारात्मक प्रेरणा सर्वांसाठी आहे.
यातून खूप शिकण्यासारखे आहे.
आपली आजची पिढी या आपल्या गावच्या आठवणी, रूढी, परंपरा, नाती गोती यांना फार विसर पाडत चाललीय.
ह्या आज्जीने आपल्या खळ्यापासून ते घरातील ठेवलेला साजेपणा तसेच घराबाहेरील आवारा यावरून कोकणातील लोकांना खूप शिकवण भेटेल.
आणि आपली कोकण संस्कृती जपली जाईल.
मित्रानु खूप चांगले प्रयत्न आहेत तुमचे!!🙏
असेच नवनवीन कोकणातील आठवणी आणत जावा. धन्यवाद 🙏🙏🙏🌹
आवारातील स्वच्छता