You are currently viewing सोमवारपासून मालवणच्या समुद्रात नौदलाची रंगीत तालीम…

सोमवारपासून मालवणच्या समुद्रात नौदलाची रंगीत तालीम…

मालवण :

 

२७ तारखेपासून नौदल दिनाच्या निमित्ताने मालवणच्या समुद्रात भारतीय नौदल आपल्या ताफ्यासह कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरू करणार आहे. याच पार्श्वभूमीवर नौदलाचे अधिकारी आणि जवानांचे येथे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. नौसेना दिवस कार्यक्रमात नौसेनेच्या विविध युद्ध नौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत जलपर्यटन व किल्ला होडी सेवा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार यंदाचा नौसेना दिवस सिंधुदुर्गात साजरा करण्यात येत आहे. नौदलाने या कार्यक्रमासाठी विविध जलदुर्गांच्या पाहणीअंती सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराची निवड केली आहे.

बंदर विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. ३ व ४ डिसेंबर रोजी येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदलातर्फे नौसेना दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही होणार आहे. या कार्यक्रमाला अतिमहनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. किल्ला परिसरातील समुद्रात उभ्या असलेल्या नौसेनेच्या युद्धनौकांची सुरक्षा तसेच सिंधुदुर्ग व राजकोट किल्ला येथील कार्यक्रमांची सुरक्षा लक्षात घेता, जलपर्यटनाच्या नावाखाली समाज विघातक प्रवृत्तींकडून घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत मालवण बंदर हद्दीतील जलक्रीडा, नौकाविहार, स्कुबा डायव्हिंग, सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी शासन आदेशानुसार कार्यवाही करून आपला व्यवसाय बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक बंदर निरीक्षकांनी केले आहे.

शिवरायांचा पुतळा उभारणीसाठी जमीन हस्तांतरित येथे ४ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या अनुषंगाने येथील स. न. १९९/२ क्षेत्र ०.३३.६० हे. आर ही शासकीय जमीन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांना हस्तांतरित करण्यात आली आहे.

तारकर्ली येथील एमटीडीसी जवळील समुद्र किनाऱ्यावर नौदलाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान, केंद्रीय तसेच राज्याचे मंत्रिमंडळ व अधिकारी, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे येथे उपस्थित असणार आहेत. या निमित्ताने याठिकाणी भव्य शामियाना उभारण्यात येत आहे. या शामियान्याच्या कामाला वेग आला आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शामियाना उभारण्यात येत आहे. शामियांच्याच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा