भाजपा महाविजय अभियान प्रदेश संयोजक आमदार श्रीकांत भारतीय यांचे प्रतिपादन
मालवण :
मालवण किनारपट्टीवर साजरा होणाऱ्या नौदल दिन कार्यक्रमा निमित्त किल्ले राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ४ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी तयारी अंतिम टप्यात आहे. मोदींच्या येण्याने मालवणचे नाव जगाच्या पटलावर अधिक ठळकपणे जाणार आहे, असे प्रतिपादन भाजपा महाविजय अभियान प्रदेश संयोजक आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले.
भारतीय जनता पार्टी मार्फत शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी शुक्रवारी भेट देऊन मोरयाचा धोंडा व किल्ले राजकोट येथे पहाणी आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा डॉक्टर सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. अमेय देसाई, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा प्रवक्ता बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, गणेश कुशे, अशोक तोडणकर, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, ललित चव्हाण, पंकज सादये, आबा हडकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मंगेश जावकर, दादा वेंगुर्लेकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी उपास्थित होते.
या दौऱ्यात आमदार श्रीकांत भारतीय यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले सिंधुदुर्गची पायाभरणी ज्या ठिकाणी केली त्या मोरयाचा धोंडा या ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर नौदल दिना निमित्त राजकोट किल्ला येथे नौसेनेमार्फत सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व तटबंदी उभारणी कामाची पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी आमदार भारतीय म्हणाले, नौदल दिना निमित्त राजकोट येथे शिवरायांचा पुतळा उभारण्यात येत आहे. या नौदल दिन कार्यक्रमास भाजपचे सर्वोच्च नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवपुतळ्याचे अनावरण होणार आहे. राजकोट याठिकाणी पुतळा उभारणीत रायगड व शिवनेरी किल्ल्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांची माती एकत्र आणून अर्पित करण्यात आली असल्याने हि जागा श्रद्धेचे मोठे केंद्र होणार आहे. हा कार्यक्रम भव्य व प्रभावी होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अंत्यत नियोजनबद्ध काम सुरु आहे. पंतप्रधान व राष्ट्रपती येत असल्याने त्यांचेही सर्वत्र उत्सुकता असल्याने त्यादृष्टीनेही तयारी करण्यात येत आहे, असेही भारतीय म्हणाले.