नगरसेवक शिशिर परुळेकर, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांचा इशारा
कणकवली
कणकवली शहरात गांगो मंदिर व एस. एम.हायस्कूल जवळील महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत करण्यात आलेल्या सर्विस रोडवर स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी वारंवार करून देखील त्याची महामार्ग ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण कडून दखल घेतली गेली नाही.त्यामुळे कणकवली शहरातील अनेक वाहनांचे लहान-मोठे अपघात या अंडरपासच्या ठिकाणी घडत आहे. रविवारी रात्री गांगो मंदिर अंडरपास जवळ मोठा अपघात होताना वाहन चालक बालंबाल बचावला. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने ही महत्वाची मागणी करून देखील ठेकेदार कंपनी याकडे पुरते दुर्लक्ष करत असल्याने कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम कोणत्याही क्षणी बंद पाडण्याचा इशारा नगरसेवक शिशीर परुळेकर व सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी दिला आहे. याबाबत महामार्ग चौपदरीकरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आमदार नितेश राणे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत लक्ष वेधण्यात आले होते. ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक के. के. गौतम यांनी तातडीने दोन्ही अंडरपास च्या ठिकाणी स्पीड ब्रेकर व बहिर्वक्र आरसे बसविण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र ठेकेदार कंपनीचे आश्वासन हवेत विरले असून जनतेच्या जीवितास यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता ठेकेदार कंपनीला आंदोलनानंतर जाग येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.