You are currently viewing पार्ल्यात रंगले गंधर्वीय स्वर !

पार्ल्यात रंगले गंधर्वीय स्वर !

*रसिकांच्या उदंड प्रतिसादात सादर झाली दिवाळी पहाट*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

सवाईगंधर्व निर्मित ‘गंधर्वगान’ हा अभंग, नाट्यसंगीत, उपशास्त्रीय गायनाचा अनोखा कार्यक्रम गेल्या मंगळवारी १४ नोव्हेंबरला दीपावली पाडव्यानिमित्त पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात संपन्न झाला. बालगंधर्व, मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा यांच्या गायन पद्धतीने सजलेली ही मैफल होती. आनंदगंधर्व पंडित आनंद भाटे आणि स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी आपल्या गंधर्वीय स्वराने श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. डॉ. भरत बलवल्ली यांनी गायनाला सुरुवात केली आणि त्यानंतर पंडित आनंद भाटे यांनी या स्वरपहाट मध्ये आपल्या स्वरांनी रांगोळी भरली. शेवटी या दोन्ही गायकांनी एकत्रित गायन करून प्रेक्षकांना गायनाचा एक विलक्षण चमत्कार दाखवला, ज्याने प्रेक्षकच नव्हे तर वादकही अवाक झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. ऑर्गनवर ज्येष्ठ वादक आणि यावर्षीचा ‘कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार’ प्राप्त झालेले मकरंद कुंडले, तबल्यावर प्रसाद करंबेळकर, बासरीसाठी वरद कठापुरकर, पखवाज दादा परब आणि तालवाद्य एकनाथ परब यांनी साथसंगत केली. ‘गंधर्वगान’ची संकल्पना आणि निर्मिती आकाश भडसावळे याची असून ‘सवाईगंधर्व’ या संस्थेची निर्मिती होती. कार्यक्रमाची सूत्र तपस्या नेवे यांनी हाताळली आणि व्यवस्थापन राकेश तळगावकर यांचे होते. हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावा अशी प्रेक्षकांनी मागणी केली. व्यास क्रिएशन्स आणि वीर सेनानी फौंडेशन यांच्या सहयोगाने झालेल्या या कार्यक्रमातून भारतीय जवानांसाठी मदत करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा