मालवण :
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – श्री देव नारायणाच्या पालखी सोहळ्यास आज दुपारी एक वाजल्यापासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला फुलांनी सजविलेल्या आकर्षक अशा नित्याच्या पालखीत बसून मालवणच्या परिक्रमनेसाठी निघाली आणि सारा आसमंत श्री देव रामेश्वर नारायणाच्या जयघोषाने भारून गेला प्रत्यक्ष देवच भक्तांच्या आपल्या भेटीला आल्याने रामेश्वर नारायण येती दारा… तोचि दिवाळी दसरा… अशी भावना प्रत्येक भक्ताच्या मनी निर्माण होऊन पालखीचे विविध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. या भाव भक्तीच्या संगमात देवांच्या भेटीने अवघी मालवण नगरी भक्तिरसात न्हाऊन गेली. आज दुपारी १ वाजता देऊळवाडा येथील श्री देव रामेश्वर मंदिरातून या पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर- नारायण पालखीत बसून मालवणच्या परिक्रमणेसाठी बाहेर पडली. तत्पूर्वी या दोन्ही ग्रामदैवतांना मानकऱ्यांनी विधिवत पूजाअर्चा करून श्रीफळ ठेवीत गाव परिक्रमणेसाठी बाहेर पडत असल्याचे गाऱ्हाणे घातले. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या तुफानी आतषबाजीत श्री देव रामेश्वर- नारायण मानकरी व आपल्या रयतेसह पालखीत बसून परिक्रमणेसाठी प्रस्थानकर्ते झाले. या पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण मालवण नगरी सजली होती. पालखीच्या स्वागतासाठी परिक्रमणा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या, पताका व स्वागत कमानी उभारल्या होत्या. श्री देव रामेश्वर- नारायणाने परिक्रमणेसाठी देऊळवाडा येथून आपली राऊळे सोडली. ही दोन्ही दैवते देऊळवाडा येथे सातेरी देवीची भेट घेऊन आडवण मार्गे वायरी कडे निघाली. आडवण येथे पालखीचे जल्लोषी स्वागत झाले. त्यानंतर दुपारी पालखी वायरी तानाजी नाक्यावर येताच पालखीवर पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले. वायरी तानाजी नाका येथून भक्तांना दर्शन देत देत श्री देव रामेश्वर- नारायण वायरी भूतनाथ येथील श्री भूतनाथच्या भेटीला गेले. त्याठिकाणी रितिरिवाजानुसार मंदिरात श्रीफळ ठेवून भेटवस्तू देण्यात आल्या. सायंकाळी हि पालखी मिरवणूक वायरी समुद्रकिनारीमार्गे ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गचे भूमिपूजन केले त्या मोरेश्वर म्हणजेच मोरयाचा धोंडा येथे पोहोचली. याठिकाणी मच्छिमार व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मोरेश्वराच्या भेटीनंतर सायंकाळी पालखी दांडी येथील श्री दांडेश्वर च्या भेटीला थांबली. पालखीच्या स्वागतासाठी वायरी- दांडी येथील मच्छीमारांनी जय्यत तयारी करून फुलमाला व पताक्यांनी आपल्या नौका सजविल्या होत्या. मछिमारांसोबतच नागरिकांनी पालखी समोर नतमस्तक होत दर्शन घेत साकडे घातले. मत्स्यव्यवसायाला आणि समुद्री पर्यटन व्यवसायाला बरकत यावी व मच्छीमारांवर आलेली संकटे दूर व्हावीत यासाठी मच्छिमार बांधवांनी आणि पर्यटन व्यावसायिकांनी रामेश्वर- नारायणाला गाऱ्हाणे घातले. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मालवण बाजारपेठेत बच्चेकंपनीनी विविध ठिकाणी गडकिल्ल्याचे देखावे साकारले होते. तर पौराणिक कथेवर चलचित्र देखावेही साकारण्यात आले होते. पाडव्यानिमित्त भरड येथील सन्मित्र रिक्षा चालक मालक मंडळातर्फे सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तर एसटी स्टँड येथेही रिक्षा व्यवसायिकांतर्फे सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.