सैनिकांच्या कल्याणासाठी प्रत्येकांनी ध्वजदिन निधी संकलनात सहभागी व्हावे
– प्र.जिल्हाधिकारी मंगेश जोशी
सिंधुदुर्गनगरी
देशाचे रक्षणार्थ अनेक सैनिकांनी आपले प्राण पणाला लावून देशाचे स्वतंत्र आबाधित ठेवले आहे. काहींनी आपल्या प्राणांची आहुतीही दिली आहे. सैनिकांच्या प्रती कृतर्ज्ञता व्यक्त करुन त्यांच्या कल्याणासाठी प्रत्येकांनी ध्वजनिधी संकलनात सहभागी व्हावे, असे आवाहन, प्र.जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी आज केले.
सशस्त्र सेना ध्वजदिन 7 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जुन्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, प्र.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा विषेश शाखेचे पोलीस निरिक्षक शिवाजी कोळी, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन व शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करुन करण्यात आली. प्रास्तविकात श्रीमती शुभांगी साठे यांनी 7 डिसेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत हा निधी गोळा केला जातो. या निधीतून शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या अडी-अडचणी दूर केल्या जातात. युध्दात किंवा युध्दजन्य परिस्थितीत अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. गतवर्षी 36 लाख 99 हजार इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. कोरोना संक्रमणामुळे उद्भवलेल्या आपत्तीजनक स्थितीतही नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे 31 लाख 85 हजार म्हणजेच अंदाजे 84 टक्के उद्दिष्ट साध्य केले असल्याचे सांगितले.
प्र.जिल्हाधिकारी श्री.जोशी म्हणाले, देशाच्या रक्षणासाठी सैन्यदलात सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त तरुण पिढीने आपले योगदान दिले पाहिजे. भारतीय सैन्याचे जगात फार मोठे महत्व आहे. सिमेवर तैनात असलेल्या जवानामुळे आपला देश सुरक्षित आहे. देशाच्या जवानांप्रती कृतर्ज्ञता व कल्याणासाठी ध्वज निधीला सढळ हाताने मदत करा. कोरोनामुळे यावर्षीचे 100 टक्के उद्दिष्ट गाठता आले नाही. तरी पुढील वर्षीचे उद्दिष्ट व मागील वर्षी शिल्लक राहिलेले उद्दिष्ट पुर्ण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यावेळी म्हणाले, ध्वजदिन निधी संकलासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुढील काळात जास्तीत जास्त सहकार्य करुन निधी संकलन करु असे सांगून, सैन्य दलात जास्तीत जास्त युवा वर्गाने जावे, यासाठी त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शन शिबिरांचे शाळा, कॉलेज यामध्ये आयोजन करण्यावर भर देणे आवश्यक आहे. सैन्यातील सेवा म्हणजे देशातील सर्वात अभिमान वाटणारी सेवा असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
यावेळी ध्वजदिन संकलन निधीचे उत्कृष्ठ काम करणारे पोलीस अधीक्षक कार्यालयातील गणेश बच्चे, सह जिल्हा निबंधक कार्यालयातील नंदकुमार चिंदरकर, जिल्हा परिषदेतील पुंजाजी बागतकर, जि.प. सामान्य प्रशासन शाखेतील अक्षय कारोटे यांचा प्रमाणपत्र व पुष्प देवून सन्मान करण्यात आला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. आभार सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय महाजन यांनी आभार मानले.