फटाके विक्रेते व व्यावसायिकांनी बंदी असलेले फटाके विक्री करू नयेत – मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे
मालवण :
केंद्र सरकारच्या अधिसूचनेप्रमाणे १२५ डिसीबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री किंवा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे फटाके विक्रेते व व्यावसायिकांनी बंदी असलेले फटाके विक्री करू नयेत. तसेच फटाक्यांची विक्री नगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच करावी, असे आवाहन मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार फटाक्यांमध्ये बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लिड, मर्क्युरी या सारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकामुळे विषारी वायू तयार होतात हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत. तसेच जनहित याचिका क्र. १५२/२०१५ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, फटाके विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम १८८४ आणि त्यास अंतर्गत केलेले विस्फोटक नियम २००८ मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाची ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ अभियानांतर्गत फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक, ग्रीन फेस्टिव्हल, सण-उत्सव साजरे करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा. सण- समारंभामध्ये टाकाऊ वस्तूंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा वापर करावा. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन संतोष जिरगे यांनी केले आहे.