You are currently viewing माणगाव खोरे….

माणगाव खोरे….

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

गरज अद्ययावत पोलीस कार्यालयाची.

संपादकीय

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे हे सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेले विस्तीर्ण क्षेत्र. जैवविविधता आणि मुबलक पाणी यामुळे माणगाव खोरे हिरवाईने नटलेले. कुडाळ तालुक्याच्या एका कोपऱ्यात वसलेलं हे माणगाव खोरे थोडे दुर्लक्षितच. पूर्वी सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात असलेले माणगाव खोरे कालांतराने कुडाळ तालुक्याचा भाग बनले. माणगाव बाजारपेठ हीच आजूबाजूच्या सर्व गावांची मुख्य बाजारपेठ. त्यामुळे माणगाव बाजारात उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते.


माणगाव खोऱ्यात आंबेरी,नानेली, कालेली, गोठोस, निवजे, महादेवाचे केरवडे, निळेली, मोरे, पुळास, साकीर्डे, हळदीचे नेरूर, उपवडे, वसोली, आंजीवडे, शिवापूर, वासी अशी बरीच गावे येतात. काही गावांमध्ये जाणारे रस्ते देखील दुर्गम आहेत. त्यामुळे माणगाव खोऱ्यात काही अवैद्य धंदे जोरदार सुरू असतात. काही ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नसल्याने अशा दुर्गम भागात गोवा बनावटीच्या दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असते. अवैद्य लाकूडतोड सुद्धा माणगावच्या आजूबाजूच्या जंगलात मोठ्या प्रमाणात होते. परंतु माणगाव खोरे दुर्गम भाग असल्याने तसेच पोलीस कुमक देखील कमी त्यामुळे संबंधित खात्याचा गैर धंद्यांवर अंमल राहत नाही.
माणगाव खोऱ्याचा कारभार पाहणाऱ्या माणगाव पोलीस कार्यालयाची तर दुरावस्था झाली आहे. इमारत बऱ्याचअंशी मोडकळीस आलेली आहे. दीपक केसरकर गृहराज्यमंत्री असताना माणगाव पोलीस चौकीचा आराखडा बनवला होता. परंतु आजदेखील माणगाव पोलीस दुरक्षेत्राची इमारत नव्याच्या प्रतिक्षेतच आहे.

माणगाव खोऱ्याचे विस्तीर्ण क्षेत्र पाहता माणगाव दुरक्षेत्राच्या जागी अद्ययावत पोलीस कार्यालयाची आवश्यकता आहे. माणगाव खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर गोव्यातील भेसळयुक्त अवैद्य दारूचा व्यवसाय चालतो. काही गावांमध्ये पहाटेच्या वेळी दुचाकीवरून आडवाटेने दारूची वाहतूक होते. जंगलमय भागात खड्ड्यांमध्ये वरून पालापाचोळा टाकून अवैधरित्या दारूसाठा केला जातो. तळीरामांना सहज गावागावात दारू उपलब्ध होते. त्यामुळे दारू धंदेवाले मात्र गडगंज झाले आहेत.
माणगाव खोऱ्यामध्ये येणाऱ्या गावांचा विचार केला असता, मोडकळीस आलेली माणगाव दुरक्षेत्राची इमारत जमीनदोस्त करून त्याठिकाणी नवे अद्ययावत पोलीस कार्यालय होणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर असताना माणगाव पोलीस कार्यालयाच्या नव्या इमारतीचा आराखडा बनवलेला होता, निदान आता तरी नवे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः लक्ष घालून माणगाव पोलीस कार्यालयाच्या इमारती बाबत सकारात्मक विचार करून माणगाव खोऱ्यासाठी अद्ययावत पोलीस कार्यालय करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी माणगाव खोऱ्यातील जनतेकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा