अविस्मरणीय प्रसंग
कोकणातील व्यक्ती जेव्हा पेटून उठतो तेव्हा काहीही करू शकतो. अशक्य गोष्टी सहजरीत्या शक्य करण्याची जादू कोकणातील युवक वर्गात आहे. 3 डिसेंबर 2020 रोजी वेंगुर्ल्यातील आडेली या गावात 18 ते 23 वयोगटातील युवक वर्ग कोणत्याही ही पूर्वकल्पना शिवाय अर्ध्या तासात एकही रुपया खर्च न करता व्याख्यानमालेचे आयोजन करू शकतात. त्याचप्रमाणे 4 डिसेंबर 2020 रोजी कोंडुरा गावात एका ऐतिहासिक गोष्टीची नोंद करण्यात आली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
⁰
सायंकाळच्या सत्रात श्री.वासुदेव जोशी, (नाणोस- सरपंच) यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे सायंकाळी ७.०० ते रात्रौ. ९.०० या दरम्यान मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तरीही त्या दिवसातील व्याख्यान चर्चासत्र काही संपले नाही.
कोंडुरा गावातील माजी उपसरपंच, श्री.अर्जुन मुळीक यांनी दुपारी मला संपर्क साधला व वेळापत्रका बद्दल विचारले. मी त्यांना सांगितले की रात्री ९.०० वाजता मी व्याख्यान संपवेल. रेडकर व्यक्ती मुंबईहून 500 किलोमीटर झोपा काढण्यासाठी आलेला नाही. *तिमिरातुनी तेजाकडे* हा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी व कोकणातील विद्यार्थ्यांचे विविध पदांवर निवड होऊन शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही स्वप्नातली संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी कोंडुरा गावात मध्यरात्री का होईना व्याख्यान तर होणारच हा शब्द दिला. या शब्दाला मान राखून व पुढाकार घेऊन श्री. अर्जुन मुळीक यांनी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना या उपक्रमाबद्दल व ध्येयवेडा असलेला कोकणातील भूमिपुत्र तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मध्यरात्री सुद्धा येणार आहे याबद्दल कल्पना दिली. युवक वर्गाने तत्परता दाखवून त्यांना यथोच्यरित्या सहकार्य केले व काल मध्यरात्री जेमतेम 1.00 च्या सुमारास हा मालवणी व्याख्यान उत्सव संपन्न झाला.
इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या छोट्याशा गावांमध्ये शेणाने सावरलेल्या कौलारू घराच्या समोरील अंगणात बसून मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांचे करिअर तसेच शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेचे म्हणजेच मालवणी व्याख्यान उत्सवाचे आयोजन सुद्धा झाले व त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून अशाप्रकारचा आगळावेगळा मालवणी व्याख्यान उत्सव जल्लोषात संपन्न झाला. वर्तमानपत्रात प्रकाशित झाले नसले तरीही कोणाच्या मुखातून ऐकले नसले तरीही यानिमित्ताने का होईना 2017 च्या कर्मचारी चयन आयोगाच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 166 व्या क्रमांकावर कोकणातील भुमिपुत्रा ची निवड झाली होती व त्याने जवळजवळ सात पदव्या संपादित केले आहेत ही यशोगाथा प्रत्येक विद्यार्थ्यास, पालक वर्गास ऐकावयास मिळत आहे. यातून प्रेरित होऊन कोकणातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षण व करिअरच्या दृष्टिकोनातून अभूतपूर्व परिवर्तन घडवतीलच यात तिळमात्रही शंका नाही.
आपल्या कोकणातील विद्यार्थी अव्वल स्थानावरील आहेत, त्यांना केवळ उचित मार्गदर्शनाची व मनोबल वाढवण्याची आवश्यकता आहे. यामुळेच तिमिरातुनी तेजाकडे ही चळवळ प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये प्रेरणादायी ठरेल. प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळून भविष्यात अधिकारी तसेच कर्मचारी स्वरूपात त्यांची निवड होऊन शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही स्वप्नतील संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी वेळ लागणार नाही.
आज कोंडुरा गावातील या ऐतिहासिक मालवणी व्याख्यान उत्सवाचे मी स्वतः ध्येयवेडा मार्गदर्शक स्वरूपात, मी दिलेले आव्हान स्वीकारून मध्यरात्रीपर्यंत मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेणारे कोंडुरा गावाचे माजी सरपंच श्री.अर्जुन मुळीक, येत्या भविष्यात शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मध्यरात्रीपर्यंत जरी जेवले नसतील तरी एकाग्रतेने व्याख्यान ऐकणारे कोंडुरा गावातील युवक वर्ग, विद्यार्थी-विद्यार्थिनी मुख्य साक्षीदार या स्वरुपात आमची भूमिका पार पाडत होतो. अशाप्रकारे माझ्याप्रमाणे, कोंडुरा गावातील युवक वर्गाप्रमाणे प्रत्येक गावातील युवक वर्गाने व श्री अर्जुन मुळीक यांच्यासारख्या पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून पुढे येणे, निशुल्क मार्गदर्शनाचा लाभ घेणे व प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे दिनांक 4 डिसेंबर 2020 रोजी सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा या गावात मालवणी व्याख्यान उत्सव जल्लोषात संपन्न झाला.