“एक वही एक पेन ” या उपक्रमा द्वारे देण्यात येणार आदरांजली…
सिंधुदुर्ग
टायगर ग्रुप सिंधुदुर्ग तर्फे 6 डिसेंबर 2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त बाबासाहेब यांना एक अनोखी” एक वही एक पेन ” या उपक्रमा द्वारे आदरांजली देण्याचा प्रयत्न करीत आहोत..
‘एक वही एक पेन’ ही संकल्पना बघताना अत्यंत साधी वाटत असली तरी या संकल्पनेचे अत्यंत व्यापक सकारात्मक परिणाम आहेत. ही संकल्पना प्रचंड यशस्वी झाली व यातून अतिशय चांगल्या पध्दतीने आंबेडकरी विचारांची सामान्यजनांस माहिती झाली. ही संकल्पना राबविण्याचे मुख्य कारण म्हणजे दरवर्षी चैत्यभूमी तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात बाबासाहेबांचे अनुयायी हार-फुले वाहून, मेणबत्ती प्रज्वलित करुन आदरांजली वाहतात. यात कुठेही दैवतीकरणाचा भाव नसला तरीही यामुळे मोठ्या प्रमाणात हार-फुले वाहिले जातात. यामुळे ते दुसऱ्या दिवशी कुठल्याही उपयोगाचे न राहता कचरा म्हणूनच वाया जातात. ही आर्थिक व पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. आणि स्वता: बाबासाहेबांना व्यक्तीपूजा अमान्य होती. भारताच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर शिक्षण हेच प्रभावी औषध असेल असे स्वता: बाबासाहेब सांगून गेले आहेत.आज भारतात शिक्षणातून विद्यार्थी गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे सरकारला प्रभावीपणे शक्य होत नाहीये. त्याकरिता अनेक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार हा पालक वर्ग असलेला विद्यार्थी आम्ही शैक्षणिक सुविधाअभावी हिरमुसून जाताना अनुभवला आहे. एकीकडे अभिवादनपर हाराफुलांचा खर्च पडतो आहे आणि दुसरीकडे आपले उद्याचे देशाचे भविष्य कोमेजून जाताना पाहणे अत्यंत वेदनादायक होते.एक वही एक पेनची संकल्पना इथूनच जन्म घेते. या संकल्पनेनुसार, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण किमान २० रुपयांचा हार-फुल घेतो त्याला पूर्णपणे बाॅयकाॅट करुन त्याच मूल्याचे ‘एक वही व एक पेन’ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून आमच्याकडे जमा करा, आम्ही ते सर्व साहित्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू. त्यांच्या शिक्षणाला तुमच्या वतीने हातभार लावू. ते विद्यार्थी शिक्षित होतील. आयुष्यात मोठ्या पदांवर विराजमान होतील. बाबासाहेबांचे उच्चशिक्षित समाजाचे स्वप्न पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला गेला आहे.